। मुंबई । प्रतिनिधी ।
केंद्र सरकारनं पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केल्यामुळं पेट्रोल व डिझेल काही प्रमाणात स्वस्त झालं आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर भाजपनं आता ठाकरे सरकारला घेरलं आहे. ठाकरे सरकारनं इंधनावरील कर कमी करायला हवा, पण त्यांची ती दानत नाही,फ अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. त्या टीकेला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
लसीचे डोस असतील किंवा पेट्रोल-डिझेलचे भाव असतील, राज्यातील सरकार नेहमी केंद्र सरकारकडं बोट दाखवतं, असा टोला पाटील यांनी हाणला होता. त्यास संजय राऊत यांनी उत्तर दिलं. मपेट्रोल, डिझेलचे भाव वाढण्यास केंद्र सरकारच जबाबदार आहे. त्यासाठी अमेरिकेला किंवा जो बायडना यांना दोष देता येणार नाही. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांकडं बोट दाखवता येणार नाही. केंद्रातील मोदी सरकारकडंच बोट दाखवावं लागेल. हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनीही केंद्राकडंच बोट दाखवलं आहे. ते भाजपचे मुख्यमंत्री आहेत. त्यांची बोटं छाटणार का?,फ असा सवाल राऊत यांनी केला.
पेट्रोल अवघ्या 5 रुपयांनी स्वस्त झाल्याबद्दलही राऊत यांनी भाजपवर टीका केली. मही देशातल्या जनतेची चेष्टा आहे. पेट्रोलचे भाव 100च्या वर न्यायचे आणि कमी करताना पाच रुपयांनी कमी करायचे. हे मोठ्या मनाचं लक्षण नाही. कुजक्या आणि सडक्या मनाचं लक्षण आहे. पेट्रोल किमान 25 ते 50 रुपयांनी स्वस्त व्हायला हवं होतं,फ असंही ते म्हणाले.
संपूर्ण देशात पोटनिवडणुकांमध्ये हरल्यामुळं केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला आहे. दरवाढ कमी करण्यासाठी भाजपला असं किती वेळा हरवावं लागेल, जेणेकरून पेट्रोल 50 रुपयानं कमी होईल. की भाजपला संपूर्ण पराभूत करावं लागेल? 2024 नंतर हे दिवस येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.