उरण-खारकोपर रेल्वे सेवा ठप्प; सावधगिरी मुळे मोठा अनर्थ टळला
| उरण | प्रतिनिधी |
धुतूम ग्रामपंचायत हद्दीतील इंडियन ऑईल अदानी व्हेंचर्स लिमिटेड या कंपनीत जेएनपीए बंदरातून जाणारी पेट्रोल-नाफ्ता ही अति ज्वलनशील पाईप लाईन बुधवारी (दि.11) सकाळी फुटल्याची घटना घडली. नागरिक व प्रशासनाच्या प्रसंग सावधगिरीमुळे मोठा अनर्थ टळला आहे. दरम्यान, सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून उरण-खारकोपर रेल्वे सेवा बंद केल्याने त्याचा त्रास प्रवासी वर्गाला सहन करावा लागला.
उद्योगपती गौतम अदानी यांच्या ताब्यात असलेल्या इंडियन ऑईल अदानी व्हेंचर्स लिमिटेड या कंपनीत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वारंवार स्फोटाच्या घटना किंवा जेएनपीए बंदरातून धुतूम ग्रामपंचायत हद्दीतील प्रकल्पात येणाऱ्या पेट्रोल, डिझेल, नाफ्ता या ज्वलनशील पदार्थ वाहून आणणाऱ्या पाईप लाईनला चोरीच्या उद्देशाने ट्याप लावण्याच्या घटना घडत आहेत. बुधवारी (दि.11) सकाळी जेएनपीए महामार्गावारील पागोटे गावाजवळील उड्डाण पूलाजवळ पेट्रोलची पाईप लाईन फुटल्याची बाब काही नागरिकांच्या निदर्शनास आली. त्याची माहिती इंडियन ऑईल अदानी व्हेंचर्स लिमिटेड या प्रकल्पातील अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी प्रसंगावधान बाळगून या फुटलेल्या पाईप लाईनच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. मात्र, सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून उरण-खारकोपर रेल्वे सेवा रेल्वे प्रशासनाने बंद केल्याने त्याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागला. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता रेल्वे सेवा सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात आली.
या घटने संदर्भात इंडियन ऑईल अदानी व्हेंचर्स लिमिटेड प्रकल्पातील अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी बोलण्यास नकार दर्शविला. तर, उरण व नवी मुंबई शहराकडे जाणारी रेल्वे सेवा बंद का करण्यात आली, यासंदर्भात रेल्वे प्रशासनाकडे विचारणा केली असता त्यांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी उरण-खारकोपर रेल्वे सेवा बंद केल्याचे सांगितले.







