| नागोठणे | प्रतिनिधी |
नागोठण्यातील मोहल्ला व लगतच्या परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या जेसडब्लू कंपनीच्या जलवाहिनीला गळती निर्माण झाल्याने गेल्या काही महिन्यांपासून मोहल्ला भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे या भागातील महिला व नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे जेसडब्लू कंपनीने जलवाहिनीची दुरुस्ती करून उच्च दाबाच्या 1100 मिलिमीटर व्यासाच्या मोठ्या जलवाहिनीतूनच आमचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवावा, अशी मागणी मोहल्ला भागातील नागरिकांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.
नागोठण्यातील नारायण सॉ मिलपासून आझाद मोहल्ला, तक्का मोहल्ला, खान मोहल्ला, मिरानगर या भागासह संपूर्ण मोहल्ला भागाला जेसडब्लू कंपनीच्या जलवाहिनीतून होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्याने नागरिकांना मुबलक पाणी मळित नाही. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी नंतर बुधवारी (दि.12) सकाळी जेसडब्लू कंपनीचे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी त्यांच्या टीम व यंत्रसामुग्रीसह महामार्गालगतच्या जलवाहिनीच्या ठिकाणी आले. पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी जेसडब्लू कंपनीकडून बुधवारी सकाळीच दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले असून, सध्या 1100 मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीतूनच मोहल्ला भागाला पाणी देण्यात येणार आहे. मात्र, मोहल्ला भागासाठी 400 मिलिमीटर व्यासाच्या नवीन जलवाहिनीतून पाणीपुरवठा करण्याचा कंपनीचा बेत असल्याचे येथील नागरिकांमधून बोलले जात आहे.
दरम्यान, जेसडब्लू कंपनीच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी जितेंद्र खरसांबळे यांच्याशी कृषीवलच्या प्रतिनिधींनी संपर्क साधला असता, कंपनीने 400 मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीतून मोहल्ला भागासाठी आधीही काही जोडण्या दिल्या आहेत. सध्या प्रायोगिक तत्वावर 400 मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीतून नव्याने देण्यात येणाऱ्या जोडणीतून पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास जुन्या 1100 मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.







