समाज माध्यमांवर डेटा लिक झाल्याने देशभर खळबळ
| रायगड | आविष्कार देसाई |
लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील देखील मतदान आता पार पडले आहे. कोणत्या राजकीय पक्षाला किती जागा मिळणार आणि कोणाची सत्ता येणार याबाबत सर्वत्रच चर्चा रंगत आहेत. अदृष्य असणाऱ्या फलोदी सट्टाबाजाराने वर्तवलेल्या अंदाजाने देशभरात खळबळ माजली आहे. समाजमाध्यमांवर उघड (लिक) झालेल्या या अहवालाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्यांनी केलेल्या आकलनानुसार देशातून मोदी सरकार पाय उतार होत असून इंडिया आघाडी बहुमताच्या जवळ जात असल्याचे म्हटले आहे. इंडिया आघाडीला सुमारे 343, तर भाजपाला सुमारे 170 जागा मिळतील असे म्हटले आहे.
या सट्टाबाजारात आतापर्यंत 100 कोटीहून अधिकचा सट्टा लागला आहे. 4 जूनपर्यंत तो 400 कोटींवर पोचणार असल्याचे बोलले जाते. देशभरात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मतदान पार पडले. त्यामध्ये मतदानाचा आकडा फारच खाली घसरला होता. त्यामुळे देशात मोदीविरोधी वातावरण असल्याचे बोलले गेले. मात्र तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडल्यावर हा आकडा काही प्रमाणात वाढला असला तरी, त्याचा फायदा हा भाजपाला होताना दिसत नाही. उलट इंडिया आघाडीला विजयाची संधी असल्याचा निष्कर्ष फलोदी सट्टाबाजाराने काढला आहे. अद्यापही पाचव्या, सहाव्या आणि सातव्या टप्प्यातील मतदान बाकी आहे. बाकी असलेल्या शेवटच्या तीनही टप्प्यात इंडिया आघाडीचे वर्चस्व राहणार असल्याचे म्हटले आहे.
सध्या देशातील हवेने दिशा बदलली असल्याचा अंदाज सट्टेबाजांनी वर्तवला आहे. नुकतेच राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही राजस्थानमध्ये काँग्रेस चांगली कामगिरी करेल, असे विधान केले होते. ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत गेहलोत म्हणाले होते की, राज्यात काँग्रेस दुहेरी आकडी जागा जिंकेल. त्याचप्रमाणे इंडिया आघाडीच्या सर्वच नेत्यांनी देशात सत्तांतर होणार असल्याचे म्हटले होते. सदरच्या आकडेवारीमध्ये काही मतदार संघाचा अंदाज सट्टेबाजांनी दिलेला नाही.
राज्य | इंडिया | भाजपा |
राजस्थान | 12 | 13 |
पंजाब | 13 | 00 |
हरियाणा | 08 | 02 |
ओरीसा | 05 | 09 (अन्य 7) |
महाराष्ट्र | 30 | 18 |
झारखंड | 10 | 04 |
हिमाचलप्रदेश | 00 | 04 |
गुजरात | 07 | 19 |
गोवा | 02 | 00 |
तेलंगणा | 11 | 03 (अन्य 3) |
तामिळनाडू | 39 | 00 |
कर्नाटक | 25 | 03 |
केरळ | 20 | 00 |
बिहार | 29 | 11 |
छत्तीसगड | 09 | 02 |
उत्तरप्रदेश | 43 | 37 |
उत्तराखंड | 03 | 02 |
सिक्कीम | 01 | 00 |
त्रिपुरा | 01 | 01 |
अरुणाचलप्रदेश | 01 | 01 |
आसाम | 08 | 06 |
मध्यप्रदेश | 10 | 19 |
आसाम | 08 | 06 |
लक्षद्विप | 01 | 00 |
पाँडेचरी | 01 | 00 |
आंध्रप्रदेश | 02 | 03 (अन्य20) |
दिल्ली | 05 | 02 |
लडाख | 01 | 01 |
काश्मीर | 06 | 00 |
बंगाल | 36 | 06 |
मणिपुर | 02 | 00 |
मेघालय | 00 | 02 |
मिझोरम | 01 | 00 |
नागालँड | 01 | 00 |
फलोदी सट्टेबाजीचा बाजार कसा सुरू झाला?
राजस्थानमध्ये फलोदी जिल्हा आहे. तेथील सट्टेबाजी बाजार सुमारे 500 वर्षे जुना असल्याची माहिती समोर आली आहे. सुरुवातीच्या काळात येथे बैलांच्या लढतीवरही सट्टा खेळाला जायचा. पुढे निवडणुकीच्या निकालाचा अचूक अंदाज बांधण्यात आणि वादळ-पावसावर सट्टा लावण्यातही हा बाजार माहीर झाला. असे म्हटले जाते की 1952 च्या विधानसभा निवडणुकीत फलोदी सट्टेबाजारात स्थानिक लोकांनी विजय किंवा पराभवावर पैज लावली होती. तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक निवडणुकीत कोट्यवधींचा सट्टा खेळला जात आहे. हा बाजार आपल्या सांस्कृतिक वारशाचा एक भाग असल्याचे तेथील स्थानिकांचे म्हणणे असल्याचे बोलले जाते.