| कोर्लई | प्रतिनिधी ।
जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरीवाल्यामुळे फणसाड धरण तुडुंब भरून वाहू लागले आहे. त्यामुळे वर्षाविहारासाठी ते पर्यटकांचे आकर्षण केंद्र ठरले आहे.
मुरुड रस्त्यावर भोईघर फाट्यापासून अवघ्या 4 कि.मी.अंतरावर असलेले हे धरण फणसाड अभयारण्यातून येणारे मोठे पाणलोट क्षेत्र असल्याने या परिसराला निसर्गाचे वरदान लाभले आहे. धबधब्याचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी मुंबई, पुणे, खोपोली, अलिबाग येथून मोठ्या प्रमाणावर पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात. कुटुंबासह येणारे निसर्गप्रेमी, युवा-युवकांचा यात वाढता उत्साह दिसून येतो. मुरुडला पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळाल्यापासून या निसर्ग रम्य परिसरात निसर्ग प्रेमींचा वर्षाविहारात ओथंबून वाहणाऱ्या उत्साहा बरोबर बऱ्याच पर्यटकांमध्ये तरुणाई धांगडधिंगाणा, मद्यप्राशनाचे वाढते प्रकार आणि अतिउत्साह यामुळे वेळप्रसंगी अपघाताचे गालबोट लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.अतिउत्साह व धरणावर पोहोण्याचा होणारा अनावर मोह यामुळे धरणात बुडून मृत्यू पावल्याच्या घटना यापूर्वी याठिकाणी घडल्या आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागातर्फे धरणाच्या निषिध्द क्षेत्रात पाण्यात उतरण्यास व पोहोण्यास सक्त मनाई असल्याचे फलक लावण्यात आले आहेत. निसर्गप्रेमींनी येथील नियमांचे काटेकोरपणे पालन करुन वर्षाविहाराचा मनसोक्त आनंद लुटावा तसेच फणसाड धरणावर येणाऱ्या पर्यटकांसाठी शासनाने याठिकाणी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरीत आहे.







