| कोर्लई | वार्ताहर |
निसर्गरम्य हिरव्यागार वनश्रीने नटलेल्या वातावरणात वर्षाविहाराची मजा काही औरच असते. नुकताच जुलै महिन्याचा तिसरा आठवडा उलटला असून, दमदार पडलेल्या पावसामुळे फणसाड धरण तुडुंब भरून वाहू लागले असून, वर्षाविहारात पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे.
अलिबाग-मुरुड रस्त्यावर भोईघर फाट्यापासून अवघ्या 4 कि.मी.अंतरावर असलेले हे धरण फणसाड अभयारण्यातून येणारे मोठे पाणलोट क्षेत्र असल्याने या परिसराला निसर्गाचे वरदान लाभले आहे. धरणावरुन खळखळणाऱ्या धबधब्याचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी मुंबई, पुणे, खोपोली, अलिबाग येथून मोठ्या प्रमाणावर पर्यटक याठिकाणी भेट देत असतात. कुटुंबासह येणारे निसर्गप्रेमी, युवा-युवकांचा यात वाढता उत्साह दिसून येतो.
महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागातर्फे धरणाच्या निषिध्द क्षेत्रात पाण्यात उतरण्यास व पोहोण्यास सक्त मनाई असल्याचे फलक लावण्यात आले आहेत. निसर्गप्रेमींनी येथील नियमांचे काटेकोरपणे पालन करुन वर्षाविहाराचा मनसोक्त आनंद लुटावा. तसेच, फणसाड धरणावर येणाऱ्या पर्यटकांसाठी शासनाने याठिकाणी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरीत आहे.