वन्यजीवांनी बहरले फणसाड अभयारण्य

। मुरुड । प्रतिनिधी ।

तीन वर्षांपूर्वी आलेल्या निसर्ग व तौक्ते चक्रीवादळाने फणसाड वन्यजीव अभयारण्यातील जुनाट झाडांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती. यातून सावरत आणि वन विभागाने केलेल्या प्रयत्नाने रायगड जिल्ह्यातील फणसाड अभयारण्यात जैवविविधता पुन्हा बहरली आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये सापडणारा वन्यजीवांचा अनमोल ठेवा अभयारण्यात विपुल प्रमाणात दिसून येतो. विविध प्रजातीचे पशु-पक्षी, वनौषधींचे याठिकाणी आढळतात. अभयारण्यात टेंटसह डॉर मेटरीमध्ये निवास व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच बैलगाडी सफरीचाही आनंद घेता येत असल्याने दिवसेंदिवस पक्षीप्रेमी, पर्यटकांची संख्या वाढत आहे.

अभयारण्याच्या परिसरात राहणार्‍या लोकांमध्ये वृक्षसंवर्धन, पशु-पक्ष्यांच्या सुरक्षेबाबत केलेल्या जागृतीमुळे तीन वर्षांत 15 टक्क्यांने वाढल्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रातील संरक्षित क्षेत्र म्हणून पाच राष्ट्रीय उद्यानांसह 33 अभयारण्ये निसर्गातील वैविध्यतेची ओळख पर्यावरणप्रेमींना देत असून फणसाड अभयारण्य त्यापैकीच एक आहे. मुरूडपासून अवघ्या 14 किमी अंतरावर सुपे गावालगत तब्बल 52 चौरस किमी जागेत फणसाड अभयारण्य विस्तारले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात फणसाड वनक्षेत्राची ओळख जंजिरा संस्थानच्या नवाबांचे राखीव शिकार क्षेत्र म्हणून केसोलीचे जंगल या नावाने ओळखले जात असे. या परिसरातील जैवविविधतेचे संरक्षण व्हावे, निसर्गाचा अनमोल ठेवा सुरक्षित राहावा, या हेतूने 25 फेब्रुवारी 1986 मध्ये फणसाड वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले.

अभयारण्यात आढळणारे सस्तन प्राणी
फणसाड वन्यजीव अभयारण्यात आजमितीस 17 प्रकारच्या सस्तन प्राण्यांची नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे मानचिन्ह असणारा झुबकेदार शेपूट असणारा राज्यप्राणी शेकरूचे (मोठी खार) दर्शन अभयारण्यात होते. शेकरूची घरटी उंच झाडावर असतात. भल्या पहाटे वा सायंकाळी अभयारण्यातील प्रमुख शिकारी प्राणी, बिबट्याचे दर्शन अनेकदा होते. भारतातील सर्वात मोठे हरिण ‘सांबर’ व जगातील सर्वात छोटे हरिण ‘पिसोरी’ हे दोन्ही या अभयारण्यात आढळतात. याच ठिकाणी वटवाघुळाची पॅटेड बॅट या प्रजातीची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय रानससा, साळिंदर, रानडुक्कर, मुंगूस, वानर, माकड, रानमांजर, तरस, कोल्हा हे वन्यप्राणी आढळतात. उल्लेखनीय बाब म्हणजे फणसाड अभयारण्यात गतवर्षापासून रानगव्यांची संख्या वाढली असून निरीक्षणात साधारण 20 रानगवे आढळले आहेत तर जानेवारी 2020 पासून दुर्मिळ असे रानकुत्र्यांचीही संख्या वाढल्याचे वनअधिकार्‍यांनी सांगितले.
कीटक विश्‍वासह अन्य प्राणीसंपदा
90 हून अधिक फुलपाखरांची अभयारण्यात नोंद झाली आहे. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ब्लू मॉरमॉनसह सर्वात लहान फुलपाखरू ग्रास ज्वेल इथे आढळतात. अभयारण्यात कॉमन मॅप, ग्रेट ऑरेंज टीप, ब्लू ऑक लिफ, कॉमन नबाब, प्लस ज्युडी, सायकी ही फुलपाखरे निसर्ग अभ्यासकांचे लक्ष वेधून घेतात. पावसाळ्यात पतंगाच्या विविध प्रजातींचे निरीक्षण सहज होते. सर्पांमध्ये घोरपडीसह हरणटोळ, तस्कर, टिंक्रेट, धामण, अजगर असे बिनविषारी तर नाग, घोणस, फुरसे, मण्यार, चापडा या सारखे विषारी सर्प मिळून 27 प्रजातीच्या सापांची नोंद करण्यात आली आहे. पावसाळ्यामध्ये बेडकासारखे अनेक विविध उभयचर पाहायला मिळतात.
दुर्मिळ वनस्पतींसह वनौषधी
अभयारण्यात 718 प्रजातींच्या सपुष्प वनस्पतींची नोंद करण्यात आली आहे. दुर्मिळ वनस्पतींसह वनौषधी मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. साग, किंजळ, अंजनी, सावर, जांभुळ, गेळा, कुडा, अर्जुन, कुंभा, ऐन आदींचा त्यात समावेश आहे. सर्वात मोठी शेंग म्हणून ओळखली जाणारी गारंबीची शेंगांची वेलही येथे पाहायला मिळते.
पक्ष्यांचीही दुनिया न्यारी
अभयारण्यात 164 प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद आहे. गिधाडे सर्वत्र नामशेष होण्याच्या मार्गावर असताना इथे पांढर्‍या पाठीच्या गिधाडांचे अस्तित्व टिकून आहे. त्यांच्या संवर्धनासाठी व्हल्चर रेस्टारंटची संकल्पना राबवण्यात आली आहे. फक्त पश्‍चिम घाटातच आढळणार्‍या पक्ष्यांसह उत्तर-पूर्व भारतातून हिमालयापासून व सैबेरियातून हिवाळ्यात स्थलांतर करून येणारे पक्षीही दिसून येतात. पांढर्‍या पोटाचा निळा माशीमार, पांढर्‍या गालाचा कटूरगा, पिवळ्या भुवईचा बुलबुल, विगोरचा शिंजीर, वन धोबी, भारतीय नीलदयाल, गप्पीदास, निलगिरी रानपारवा, बेडूकमुखी पक्षी, धीवर, धनेश आदी असंख्य पक्ष्यांची नोंद निरीक्षणात झाली आहे.


डिसेंबरपासून शाळा, महाविद्यालयाच्या सहली कोकण दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर येत असल्याने अभयारण्यात निसर्गप्रेमींची संख्या वाढत आहे. थंडीचा हंगाम सुरू असल्याने निसर्ग भ्रमंतीसाठी मोठ्या संख्येने पर्यटक येत असून दरमहा 500 ते 600 पर्यटकांची हजेरी लावतात. याच काळात स्थलांतरित पक्षीही मोठ्या प्रमाणात आढळतात.

तुषार काळभोर, वनपरिक्षेत्र अधिकारी,
फणसाड अभयारण्य
Exit mobile version