कर्जतमध्ये किल्ले रायगड फोटो प्रदर्शन

श्री छत्रपती शिवाजी मंडळाचा स्तुत्य उपक्रम; एका छताखाली साहस, इतिहास, कलेचा संगम

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत येथील श्री छत्रपती शिवाजी मंडळाच्यावतीने शिवशंभो युवा हायकर्स यांच्या कार्याची माहिती देणारे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले रायगडाची माहिती देणारे चित्र प्रदर्शन भरवले आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होत आहे.

कर्जत येथील पाटील आळीमधील हनुमाना मंदिराच्या सभागृहात छत्रपती शिवाजी मंडळाच्यावतीने चित्र प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन पत्रकार संतोष पेरणे, विजय मांडे, अभिनेते निर्माते दिग्दर्शक प्रदीप गोगटे आणि संगीतकार व गायक गौतम वैद्य यांच्या हस्ते पार पडला. यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज मंडळ कर्जतचे अध्यक्ष गजानन गुरव, ज्येष्ठ मार्गदर्शक म्हसे, प्रसिद्ध व्यंगचित्रकार विशाल सुरावकर, संस्थेचे अध्यक्ष विकास चित्ते, उपाध्यक्ष सुधांशू वनगे, सचिव शैलेश सातपुते, उपखजिनदार महेंद्र कर्वे, ज्येष्ठ सदस्य अमित गुरव, सदस्य अमेय कुलकर्णी, नेहा सातपुते, वैष्णवी गुप्ता आणि गौरव चित्ते उपस्थित होते.

कर्जत शहरातील पाटील आळी येथे असलेल्या हनुमान मंदिराच्या दुसऱ्यामजल्यावरील दालनामध्ये शिवशंभो युवा हायकर्सतर्फे किल्ले रायगडच्या विविध भागांचे तपशीलवार फोटो प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनात रायगड किल्ल्याचा विविध अंगी अभ्यास करता येणार आहे. किल्ले रायगड फोटो प्रदर्शनासोबतच शिवशंभो युवा हायकर्स संस्थेने लहान मुले व तरुणांमध्ये साहस, जिद्द, पराक्रम आणि छत्रपतींविषयी प्रेम निर्माण व्हावे म्हणून अनेक उपक्रमांचे आयोजन केले आहे. त्याचेही फोटो या प्रदर्शनात पाहायला मिळत आहेत. त्याचसोबत रायगड किल्ल्यावर सापडलेले काही ऐतिहासिक नमुने तसेच गिर्यारोहण साहित्य हे सुद्धा या प्रदर्शनाच्या आकर्षणाचा महत्त्वाचा भाग आहे. अशाप्रकारे एका छताखाली साहस, इतिहास आणि कला याचा सुरेख संगम कर्जतकर रसिकांना अनुभवायला मिळत असून, या प्रदर्शनास कर्जतकर रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असल्याचे गडकिल्ले छायाचित्रकार, अभ्यासक शैलेश सातपुते आणि ज्येष्ठ गिर्यारोहक विकास चित्ते यांनी आवाहन केले आहे.

Exit mobile version