एक ठार, सात जण जखमी
। श्रीवर्धन । प्रतिनिधी ।
श्रीवर्धन तालुक्यातील बोडणी घाटात दुपारी काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. आंबा तोडणीसाठी मजुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअप गाडीवर सिमेंटने भरलेला अवजड ट्रेलर पलटी झाला. या अपघातात एका मजुराचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य 7 ते 8 मजूर गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, ट्रेलरखाली दबल्या गेलेल्या पिकअप गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे.
सध्या कोकणात हापूस आंबा तोडणीचा हंगाम शिगेला पोहोचला आहे. याच कामासाठी मजुरांची एक टोळी पिकअप व्हॅनने बोडणी घाटातून जात होती. दुपारी साडेबाराच्या सुमारास घाटातील एका तीव्र वळणावर समोरून येणाऱ्या ट्रेलरवरील चालकाचे नियंत्रण सुटले. चढणीवर नियंत्रण न राहिल्याने हा अवजड ट्रेलर थेट पिकअपच्या डाव्या बाजूवर कोसळला. यात वाहनातील मजूर ट्रेलर आणि सिमेंटच्या गोण्यांखाली दबले गेले.
अपघाताचा आवाज ऐकून बोडणी आणि परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. क्रेन येईपर्यंत स्थानिकांनी स्वतःहून सिमेंटच्या गोण्या बाजूला करून जखमींना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. माहिती मिळताच श्रीवर्धन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णवाहिकेने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, एका मजुराने उपचारापूर्वीच प्राण सोडले होते.
या अपघातातील तीन मजुरांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्यांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय किंवा मुंबईतील रुग्णालयात हलवण्याची शक्यता आहे. मृत मजूर हा परजिल्ह्यातील असून पोलीस त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधत आहेत.
बोडणी घाटातील अरुंद रस्ता आणि धोकादायक वळणे वाहनचालकांसाठी नेहमीच कसरत ठरतात. त्यातच अवजड वाहनांची वर्दळ वाढल्याने येथे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. ‘या घाटात संरक्षक कठडे बसवणे आणि वळणांचे रुंदीकरण करणे गरजेचे आहे, अन्यथा अशा घटनांची पुनरावृत्ती होत राहील,’ अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
या प्रकरणी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, अपघातग्रस्त ट्रेलर आणि पिकअप क्रेनच्या साहाय्याने बाजूला करून घाटातील वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे.
