। नाशिक । प्रतिनिधी ।
नंदुरबार येथून अस्तंबा ऋषींच्या यात्रेहून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीचा चांदशैली घाटात भीषण अपघात झाला. या अपघातात पिकअपमधील सात जणांचा जागीच मृत्यू झाला. तर आठ जण गंभीर आणि 10 जण किरकोळ जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांश नंदुरबार तालुक्यातील भाविकांचा समावेश आहे.
दरवर्षी दीपावलीच्या पर्वावर धडगाव तालुक्यातील असली येथे अस्तंबा (अश्वत्थामा) ॠषिची यात्रा भरते. यासाठी लाखो भाविक या ठिकाणी भेट देतात. दरम्यान शुक्रवारी वसुबारसच्या दिवशी नंदुरबार तालुक्यातील काही भाविक अस्तंबा ॠषिच्या दर्शनासाठी गेले होते. आज शनिवारी (दि.18) तेथून परत येत असताना दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास चांदसैली घाटात या भाविकांची पिकअप गाडी खोल दरीत कोसळली. यावेळी पिकअप गाडीमध्ये जवळपास 25 भाविक असल्याची मिळत आहे.
या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला. यातील पाच मयत नंदुरबार तालुक्यातील घोटाणे येथील रहिवासी आहेत. तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच सुमारे 10 जण किरकोळ जखमी झाले आहेत. गंभीर जखमी भाविकांना नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर किरकोळ जखमींना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. जखमींमधील काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.







