। पनवेल । प्रतिनिधी ।
मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यामुळे समोरील ट्रेलर न दिसल्याने पळस्पे-जेएनपीटी रोडवर पिकअप वाहन ट्रेलरच्या मागील बाजूस जोरदार धडकले. या भीषण अपघातात पिकअपमधील क्लिनरचा मृत्यू झाला, तर चालक गंभीर जखमी झाला आहे.
या अपघातातील पिकअप वाहन (एमएच-43-जीएक्स-9291) पनवेल येथून जेएनपीटीच्या दिशेने जात होते. यावेळी पळस्पे जेएनपीटी मार्गावरील निसर्ग ढाब्याजवळ पिकअप वाहन आले असताना, मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यामुळे चालकाला समोरील ट्रेलर निदर्शनास आला नाही. त्यामुळे भरधाव वेगात असलेली पिकअप गाडी ट्रेलरच्या मागील बाजूस धडकली. या अपघातात चालक संदेश सर्जेराव केसरे (42) आणि त्याच्यासोबत बसलेला अशोक दत्तात्रय मस्कर (54) असे दोघे गंभीर जखमी झाले. दोघांनाही तातडीने कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान अशोक मस्कर यांचा मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला.
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात चालकाने भरधाव वेगाने, निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे हा अपघात झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार पनवेल शहर पोलिसांनी पिकअप चालकाविरोधात गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे.
Accident News: ट्रेलरवर आदळून क्लिनरचा मृत्यू
