। दांडगुरी । वार्ताहर ।
माणगाव तालुक्यातील साळवे-कोस्ते खुर्द येथील कालभैरव आणि कालेश्री माता यांच्या जीर्ण झालेल्या मुर्त्या सोमवरी (दि.3) सकाळच्या सुमारास पिकअपच्या सहाय्याने हरिहरेश्वर येथील समुद्रकिनारी विसर्जित करण्यासाठी आणल्या गेल्या होत्या. मात्र, येथील पाण्याचा अंदाज न आल्याने पिकअप वाळूत रूतला. त्या पिकअपच्या चालकासह प्रवासी ग्रामस्थांनी रूतलेला पिकअप काढण्याची पराकाष्टा केली. परंतु, त्यांना अपयश आले. त्यानंतर पाण्याचा प्रवाह आणखी वाढला आणी पिकअप पुर्णपणे पाण्यामध्ये फसला गेली.
ही वार्ता हरिहरेश्वर येथे कार्यरत असलेले साळुंखे रेस्न्यू टीमच्या सभासदांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु, पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे त्यांना देखील पिकअप बाहेर काढण्यात अपयश येत होते. पिकअप पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊ नये म्हणून किनारी असलेल्या झाडाचा आधार घेत तो मजबूत दोरीने बांधण्यात आला. शेवटी ओहोटी लागल्यानंतर पिकअप यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आला. या मदत कार्यासाठी साळुंखे रेस्न्यू टीमसह स्थानिक ग्रामस्थांनी प्रयत्न केले.