। सुधागड-पाली । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा गावातील जुनी कुंभारआली येथे जांभुळीच्या झाडात जिवंत विद्युत वाहीनीची तार गुरफटली गेली आहे. हे झाड रस्त्यालगतच आहे तसेच येथे लहान मुले खेळण्यासाठी येत असतात. शिवाय नागरिकांसह जनावरांचा देखील या रस्त्यावर मुक्तसंचार असतो. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होण्याची दाट शक्यता स्थानिकांकडून वर्तविली जात आहे. दरम्यान, जांभुळपाडा गावातील रहिवासी नुरजहाँ पठाण यांनी सांगितले की, वारा आला की त्या तारा एकमेकांना चिकटल्याने ठिणग्या पडतात. एखादा अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण? त्यामुळे महावितरण अधिकारी व कर्मचार्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन लवकरात लवकर उपाययोजना करावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.