। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील कळंब ग्रामपंचायतीतील सुतार पाडा येथील आदिवासी कुटुंब वर्षानुवर्षे कच्च्या घरात राहत होते. प्लॅस्टिकच्या छपराखाली जगणार्या आंबो कमळू पारधी यांच्या कुटुंबाचे घराचे स्वप्न मुंबई येथील ईशार्जुन संस्थेच्या माध्यमातून पूर्ण झाले आहे. त्यांना शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ मिळाला नव्हता. मात्र, खासगी संस्थेने पुढाकार घेतल्यामुळे त्यांना आता पक्क्या घरात राहायला मिळणार असल्याने त्यांच्या चेहर्यावर वेगळाच आनंद दिसत होता.
दरम्यान, आंबो पारधी यांच्या घराची व्यथा सामाजिक कार्यकर्ते दीपक बोराडे यांनी मुंबई येथील ईशार्जुन संस्थेकडे मांडली होती. सुतार पाड्यातील कुटुंबाला सरकारी योजनांतून घरकुल मिळावे यासाठी केलेला पाठपुरावा यशस्वी होत नसल्याने शेवटी बोराडे यांनी खासगी एनजीओची मदत घेतली. दीपक बोराडे यांनी संस्थेच्या अध्यक्षा माधुरी बुधराणी यांच्याशी संपर्क साधून एका कार्यक्रमाच्या निमित्ताने या कुटुंबाच्या परिस्थितीची सविस्तर माहिती दिली. पारधी कुटुंबाची झोपडी ईशार्जुन ट्रस्टच्या सर्व सदस्यांनी पाहिली आणि संस्थेच्या अध्यक्षा माधुरी बुधराणी यांनी तातडीने निर्णय घेत फक्त आठ दिवसांत घराच्या बांधकामाची प्रक्रिया सुरू केली. आणि 2 मार्च रोजी आंबो पारधी यांच्या नव्या घराचा गृहप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी पारधी कुटुंबाच्या चेहर्यावर आनंद ओसंडून वाहत होता.