16 धारकरी जखमी
। पोलादपूर । प्रतिनिधी ।
पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटाच्या तीव्र वळण उतारावर शनिवारी (दि. 08) पहाटेच्या सुमारास सांगली जिल्ह्यातील अंकलखोप येथून आलेल्या पिकअप जीप कलंडून अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, या अपघातात शिवतीर्थ गडकिल्ले धारातीर्थ मोहिमेतील 16 धारकरी जखमी झाले आहेत.
सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील अंकलखोपचे 16 धारकरी पिकअप जीपने श्री शिवछत्रपती प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या श्रीमान शिवराजधानी रायगड धारातिर्थ गडकोट मोहिमेत सहभागी होण्यासाठी पोलादपूर तालुक्यातील उमरठ येथे निघाले होते. त्याचवेळी, पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटामध्ये प्रतापगड बाजूने येताना तीव्र वळण उताराच्या रस्त्यावर कुंभळवणे फाटयालगत त्यांच्या पिकअप जीपने रस्त्याच्या संरक्षक कठडयाला धडक दिली आणि पिकअप जीप रस्त्यालगत कलंडली. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, या अपघातात 16 धारकरी जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठविले.
गणेश संजय गायकवाड (17), अक्षय वाल्मीक पाटील (25), सत्यम शितल पुजारी (21), ओमकार रविंद्र खामकर (22), यश बाळासाहेब उपाध्ये (23), सागर जकप्पा हल्लोळी (27), पवन कुमार राजेंद्र जाधव (17), योगेश नागेश खामकर (25), अवधूत घनश्याम कुलकर्णी (25), कुणाल बाळासाहेब उपाध्ये (17), पवन दादासाहेब साळुंखे, ओम उदयसिंह कोळी (19), अविष्कार आप्पासाहेब शिंदे (19), संकेत संजय जाधव (24), रोहन सिद्राम तलवार (28), विशंभर वासुदेव जोशी (16) अशी अपघातातील जखमींची नावे आहेत.