पिक्चर अभी बाकी है: आ. जयंत पाटील

रोहा येथे अनंत गीते यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा

| अलिबाग | प्रतिनिधी |

सुनील तटकरे यांना मोठे करण्याचे काम त्यांचे बंधू अनिल तटकरे यांनी केले आहे. त्यांच्यासोबतदेखील तटकरे यांनी विश्‍वासघात केला. गद्दारी करणार्‍या या भुताला बाटलीत भरायचे काम करायचे आहे, असे गीते सांगतात. मात्र, हा त्यातूनही बाहेर पडेल. त्यामुळे सुनील तटकरे यांना गाडण्याचे काम करायचे आहे. शेतकरी कामगार पक्ष संपविणार असे बोलणार्‍यांनो पिक्चर अभी बाकी है, असा सज्जड इशारा आ. जयंत पाटील यांनी दिला.

रोहा येथे इंडिया आघाडीच्यावतीने शुक्रवारी जाहीर सभा आयोजित केली होती. यावेळी आ. जयंत पाटील बोलत होते. यावेळी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे, युवक प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शरद पवार गट महबुब शेख, प्रदेश उपाध्यक्ष अनिल तटकरे, शंकरराव म्हसकर, मुस्लीम मराठी समाजाचे अध्यक्ष सुभान अली, डॉ. रियाज पठाण, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, अनिल नवगणे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील देशमुख, शेकापचे नेते अ‍ॅड. सुनील सानप, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक गणेश मढवी, शेकाप रोहा तालुका चिटणीस राजेश सानप, शिवसेनेचे शहर प्रमुख दीपक तेंडुलकर, आम आदमी पार्टीचे प्रवक्ते साबीर पठाण आदी इंडिया आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

याप्रसंगी कार्यकर्त्यांना संबोधित करताना आ. जयंत पाटील म्हणाले की, त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद आहे, दहा मंत्री, महामंडळे आहेत. पण, यांना जागा फक्त चारच मिळाल्या आहेत. त्या चारही जागा पडणार आहेत. आम्ही गोरगरीबांसाठी लढणारे आहोत, कोणताही डाग लावून घेतला नाही. गरीबांशी बांधिलकी ठेवून काम करतो. या निवडणुकीत आमूलाग्र बदल होणार आहे. शेकापक्ष संपविणार असे बोलणार्‍यांनो ‘पिक्चर अभी बाकी है’, असा टोला आ. जयंत पाटील यांनी लगावला.

आ. जयंत पाटील म्हणाले की, सुनील तटकरेंना ज्यांनी ज्यांनी मदत केली, त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसण्याचे काम तटकरेंनी केले. ज्या ओटीवर हे मोठे झाले, ती कुळकर्णींची ओटी तशीच राहिली. तटकरे जेवले, चहा प्यायले. पण, कुलकर्णींना जेवण दिल्याचे आठवत नाही. आज मुस्लिम समाज 90 टक्के, दलित, श्रमिक समाज 100 टक्के महाआघाडीच्या पाठीशी आहे. संविधान वाचवण्यासाठी इंडिया आघाडी झाली. आम्ही 75 वर्षे लढलो, शेकाप गरिबांचा आहे. आमच्यावर एकही डाग नाही. आता तटकरेंसारख्या गद्दाराला गाडायचे आहे.

ते पुढे म्हणाले, या जिल्ह्याबरोबरच राज्यातील असंख्य मुस्लीम समाज आपल्यासोबत आहे. दलित समाज आपल्यासोबत शंभर टक्के आहे. हा जिल्हा महाविकास आघाडीने पिंजून काढला आहे. मतदारांना जागरुक करण्याचे काम सुषमा अंधारे आणि सुभान अली यांनी केले आहे. या बदलत्या वातावरणामुळे महाराष्ट्रात सर्वाधिक मते मिळवणारे अनंत गीते असणार आहेत, असा विश्‍वास आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

पोटावर मारण्याचा तटकरेंचा धंदा: समीर शेडगे
रोह्यामध्ये रुग्णालय व्हावे ही मोठी अपेक्षा आहे. आ. जयंत पाटील यांची साथ मिळाली तर नक्कीच रोह्यात रुग्णालय उभे राहील, असा विश्‍वास शिवसेनेचे नेते समीर शेडगे यांनी व्यक्त केला. पुढे ते म्हणाले की, करोडो रुपये रोह्याच्या विकासासाठी आणले असल्याच्या बतावण्या तटकरे यांनी केल्या. पण, अनेक कामे अपूर्णच राहिली आहेत. भुयारी गटारे काँक्रिटच्या रस्त्यात गाडली गेली आहेत. या ठिकाणी बांधलेला टाऊन हॉल अपूर्ण राहिला आहे. नगरपरिषदेमध्ये अनेक नगराध्यक्ष होऊन गेले; पण त्यांचे राजकीय अस्तित्व संपविण्याचा प्रयत्न सुनील तटकरेंनी केल्याचा घणाघाती आरोप शेडगे यांनी केला आहे. रोहेकरांना भीती दाखवून मते मिळविण्याचे काम त्यांनी केले आहे. रोह्यातील सर्वसामान्यांची अर्बन बँक तटकरेंनी बंद पाडली. पोटावर मारणे हाच तटकरेंचा धंदा, असा आरोप समीर शेडगे यांनी करीत सात तारखेला मशाल चिन्हावर बटण दाबून अनंत गीते यांना निवडून द्या, असे आवाहन केले.
इलाका तुम्हारा, धमाका हमारा: सुषमा अंधारे
मोदींची गॅरंटी काय सांगता, आता तुमची गॅरंटी आहे का? उद्या जास्त खोके दिले तर भाजपात जाल, हीच आहे तुमची गॅरंटी. बॅ. ए.आर. अंतुले, आ. जयंत पाटील, आता शरद पवार यांच्याशी गद्दारी केलीत. कित्येक पिढ्यांची प्रॉपर्टी केलीत. आता इलाका तुम्हारा, धमाका हमारा रहेगा, असा जोरदार घणाघात शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सुनील तटकरे यांच्यावर केला. शरद पवार यांनी तुम्हाला सर्व अधिकार, मंत्रीपद दिले, त्यांच्याशी गद्दारी केली. सर्वांना दगा देणार्‍या तटकरेंची गॅरंटी काय, असा सवालही अंधारे यांनी उपस्थित केला. त्या म्हणाल्या की, ‘वन नेशन, वन इलेक्शन’ची भूमिका भाजपची आहे. हे रोखणे गरजेचे आहे. कारण, भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थांसह सर्व निवडणुका बंद होतील. हे रोखण्यासाठी या निवडणुकीत त्यांना पाडण्याचे काम करा. खुल्या पत्रकार परिषदेला सामोरे जाण्याची हिंमत मोदींकडे नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडी तीस पार असणार असे खात्रीने सांगते, असे त्यांनी सांगितले.
Exit mobile version