। उरण । वार्ताहर ।
उरण नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे शहरातील कचर्याच्या समस्येकडे ठेकेदाराबरोबर असलेल्या आर्थिक हितसंबंधांमुळे दुर्लक्ष होत असल्याने अनेक भागात कचर्याचे ढीग साचलेले आहेत.
उरण शहरातील कचरा गोळा करण्याचा कोट्यवधी रुपयांचा ठेका दिला आहे. परंतु, ठेकेदाराकडून मुख्य रस्त्यावरील कचरा उचलून मैदानावरील कचराचा साठा तसाच ठेवला जात आहे. याबाबत मुख्याधिकारी समीर जाधव व आरोग्य निरीक्षक हरेश तेजी यांच्याकडे वारंवार तक्रारी करून ही परिस्थिती जैसे थेच आहे. तसेच, कचरा गोळा करणारी गाडी कधी पण येत असल्याने दुकानदार आपला कचरा रस्त्यावर किंवा अडगळीत टाकून मोकळे होतात. त्याचबरोबर कचरा गोळा करणार्या कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीच उपकरणे प्रामुख्याने हॅन्डग्लोज, गमबुट, मास्क न लावता काम करीत असल्याचे चित्र सर्रासपणे पहावयास मिळत आहे. ठेकेदार नगरपालिका अधिकारी वर्गांशी साटेलोट करून आपला बिल काढीत आहे. त्यामुळे शहरातील जनतेचे व कचरा गोळा करणारे कामगार वर्ग यांचे आरोग्य धोक्यात येऊन त्यांना आजाराने ग्रासले आहे. याबाबत वरिष्ठांनी यांची नोंद घेऊन ठोस कारवाई करण्याची मागणी शहरातील जनतेकडून केली जात आहे.