बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची मांदीआळी

| पाली/बेणसे | धम्मशील सावंत |

महाराष्ट्रातील प्रख्यात धार्मिक स्थळ असलेल्या पालीत गणेशभक्तांची सलग वर्दळ सुरूच आहे. श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थीला रविवारी (दि.3) अष्टविनायकांपैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीतील बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पहाटे पासून बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. यावेळी छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचा व्यवसाय तेजीत होता. रविवारची सुट्टी असल्याने रायगड जिल्ह्यासह मुंबई, ठाणे, पुणे व राज्यातून पालीत हजारोच्या संख्येत भाविक व त्यांची वाहने दाखल झाली होती. वाहनांमुळे वाहतूक कोंडी देखील झाली होती.

काही भक्तांनी मंदिर गाभाऱ्यात श्रुश्राव्य भजन व आरती देखील केली. भाविकांची मोठी गर्दी असल्याने येथील दुकानदार व हॉटेल व्यवसायिक यांचा व्यवसाय देखील तेजीत होता. परिसरातील दुकाने, हॉटेल व लॉज ग्राहकांनी गजबजले होते. येथील हॉटेल, खेळण्याची व शोभिवंत वस्तुंची दुकाने, नारळ, हार, फुले व पापड मिरगुंड, कडधान्य विक्रेते, प्रसाद व पेढेवाले सुखावले होते. मंदिर परिसरात मोठी वर्दळ होती. बल्लाळेश्वर मंदिर परिसरात रानभाज्या घेऊन अनेक विक्रेत्या महिला विक्री करताना दिसून आल्या. देवळात येणारे भाविक आवर्जून येथून या रानभाज्या खरेदी करताना दिसले. त्यामुळे या विक्रेत्यांचा धंदा सुद्धा चांगला झाला. भाविकांच्या सोईसाठी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती.

वाहतूक कोंडी
पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चोख सुरक्षा व व्यवस्था करण्यात आली होती. वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी नाक्यावर वाहतुक पोलीस तैनात होते. मात्र अरुंद रस्ते, अवजड, एकेरी वाहतुकीवरुन दुहेरी वाहतुक आणि वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम न पाळल्याने, तसेच रस्त्याच्या दुतर्फा अवैध्यरित्या पार्क केलेली वाहने यामुळे पोलीसांना या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविणे अवघड झाले होते. बल्लाळेश्वर मंदिर परिसरात बल्लाळेश्वर देवस्थानचे सुरक्षा रक्षक देखील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तैनात असल्याचे दिसले.

देवस्थान ट्रस्टने भाविकांसाठी विशेष सोयीसुविधा उपलब्ध केल्या आहेत. देवस्थानचे दोन अत्याधुनिक सोईसुविधांनी युक्त भक्त निवास नाममात्र दरात भाविकांसाठी उपलब्ध केले आहेत. बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी आरोचे शुद्ध थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मेटल डिटेक्टर लावले आहेत. रांगेत उभे राहण्यासाठी रेलींग, मांडव व शेड उभारण्यात आली आहे. वाहने पार्क करण्यासाठी देवस्थानची दोन भव्य मोफत पार्किंग देखील आहे. प्रसादालय खुले आहे. तसेच सुसज्ज स्वच्छता गृह देखिल उभारण्यात आले आहेत. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होत नाही.

जितेंद्र गद्रे, अध्यक्ष, बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट, पाली

रविवारी संकष्टी चतुर्थी आल्याने तसेच श्रावण महिना असल्याने मोठ्या प्रमाणात भाविक बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी आले होते. भाविकांची वर्दळ असल्याने व्यवसाय देखील चांगला झाला.

राहुल मराठे, व्यावसाईक, बल्लाळेश्वर देवस्थान
Exit mobile version