संकष्टी चतुर्थीला बाप्पाच्या चरणी गार्हाणे
। पाली/बेणसे/गोमाशी । वार्ताहर ।
सध्या महाराष्ट्र आस्मानी व नैसर्गिक आपत्ती तसेच परतीच्या पावसाने ग्रासला गेला आहे. शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यातच महागाईने देखील सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. सुशिक्षित तरुण रोजगारासाठी वणवण भटकंती करीत आहे. अशा अनेक समस्या व संकटांनी हैरान झालेल्या भाविकांनी रविवारी (दि.20) संकष्टी चतुर्थीला महाराष्ट्रातील प्रख्यात तीर्थक्षेत्र असलेल्या पालीतील बल्लाळेश्वर चरणी साकडे घालण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीतील श्री बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पहाटे पासूनच दर्शनासाठी लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी बल्लाळेश्वर मंदिर व गाभार्यात फुलांची सजावट करण्यात आली होती. बल्लाळेश्वरला देखील आभूषण व वस्त्र परिधान करण्यात आले होते. रविवारी सुट्टी असल्याने बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रभरातून हजारो पर्यटक व भाविक दाखल झाले होते. यामुळे येथे चांगली आर्थिक उलाढाल झाली असून येथील स्थानिक व्यावसायिक सुखावला आहे.
दर्शनासाठी आलेल्या भाविकांमुळे मंदिर परिसरातील दुकाने व हॉटेल ग्राहकांनी गजबजले होते. मंदिर परिसराला यात्रेचे स्वरुप आले होते. यामुळे येथील हॉटेल व्यावसायिक, लोजिंग बोर्डिंगवाले, पापड, लोणचे, मिरगुंड विक्रेते, पेढेवाले, सरबतवाले, छोटेमोठे दुकानदार व इतर व्यावसायिकांचा धंदा तेजीत होता. तसेच, भाविकांच्या सोईसाठी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्यावतीन चोख व्यवस्था करण्यात आली होती.
संकष्टी चतुर्थीला रविवारी सुट्टी असल्याने भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत आहेत. हे भाविक दुकानातून चांगली खरेदी करत आहेत. यामुळे धंदा चांगला होत आहे.
नरेश बैकर,
व्यावसायिक, बल्लाळेश्वर मंदिर
बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्यावतीने भाविकांच्या सोयीसाठी शुद्ध थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नाममात्र दरात प्रसादालयामध्ये प्रसाद (भोजन) उपलब्ध आहे. सुरक्षारक्षक तैनात आहेत. भाविकांना राहण्यासाठी दोन सुसज्ज भक्त निवास आहेत. रांगेत उभे राहण्यासाठी रेलींग व शेड उभारण्यात आली आहे. वाहने पार्कींगसाठी देवस्थानची दोन मोफत पार्किंग आहे. तसेच, सुसज्ज स्वच्छता गृह देखिल उभारण्यात आले आहेत. यामुळे दर्शनासाठी येणार्या भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होत नाही.
जितेंद्र गद्रे,
अध्यक्ष, बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट, पाली
आदिवासी महिलांना रोजगार
बल्लाळेश्वर मंदिर परिसरात गावठी भाज्या, फुले घेऊन अनेक आदिवासी विक्रेत्या महिला विक्री करत आहेत. देवळात येणारे भाविक आवर्जून येथून खरेदी करत आहेत. यामुळे या विक्रेत्यांचा धंदा सुद्धा चांगला होत असून त्यांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
वाहतुक कोंडीचे विघ्न
बल्लाळेश्वरच्या दर्शनाला अनेक भाविक स्वतःची वाहने घेऊन तर, काही लक्झरी किंवा खासगी बसेसने आले होते. शिवाय मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था झाली असल्याने इतर पर्यटक देखील पालीतून दक्षिण रायगड व कोकणाकडे तसेच पुणे-मुंबईकडे जात होते. परिणामी पर्यटक व भाविकांच्या गाड्यांमुळे पालीत मोठ्या प्रमाणावर वाहतुक कोंडी झाली होती.
