| अहमदाबाद | वृत्तसंस्था |
दोन आठवड्यांपूर्वी 12 जून रोजी एअर इंडियाच्या दुर्घटनाग्रस्त झालेल्या विमानाच्या अवशेषांमधून दुसऱ्या दिवशी ताब्यात घेण्यात आला होता. एअर इंडियाचं 171 हे विमान नेमकं कशामुळे दुर्घटनाग्रस्त झालं? शेवटच्या क्षणी नेमकं कॉकपिटमध्ये काय घडलं? वैमानिकानं अपघात टाळण्यासाठी नेमके कोणते प्रयत्न केले? दोन्ही वैमानिकांमध्ये काय संवाद झाला? या आणि अशा सर्व प्रश्नांची उत्तरं या ब्लॅक बॉक्समधून शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
दुर्घटनेत या ब्लॅक बॉक्सचं काहीसं नुकसान झाल्यामुळे त्यातील माहितीबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र, त्यातील माहिती यशस्वीरीत्या डाऊनलोड करण्यात आल्याचं केंद्रीय मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. कोसळलेल्या विमानाच्या ब्लॅक बॉक्समधून डेटा डाऊनलोड करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असल्याचे सरकारने गुरुवारी स्पष्ट केले आहे. एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोप्रमुखांच्या नेतृत्वाखालील एक बहु-विद्याशाखीय पथक या विमान अपघाताची चौकशी करत आहे. अधिकाऱ्यांच्या मते, तपासाचा एक भाग म्हणून कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डरचे विश्लेषण सुरू करण्यात आले आहे.
‘पुढील ब्लॅक बॉक्समधून क्रॅश प्रोटेक्शन मॉड्यूल सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आले असून, 25 जून रोजी मेमरी मॉड्यूलमधील माहिती यशस्वीपणे मिळवण्यास सुरुवात केली आहे. त्याचा डेटा एएआयबी लॅबमध्ये डाउनलोड करण्यात आला आहे,’ असे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे. विश्लेषणातून हे निश्चित होईल की, अपघातामागे तांत्रिक बिघाड, पायलटची चूक की कोणते बाह्य कारण होते. याचा उद्देश हवाई सुरक्षा अधिक उत्तम करणे आणि भविष्यात अशा घटना टाळणे हा आहे.
या अपघाताच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या पथकाबाबत माहिती देताना नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने सांगितले की, आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलनुसार स्थापन केलेल्या या पथकाचे नेतृत्व एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोचे प्रमुख करत आहेत व या पथकात एक विमान औषध तज्ज्ञ, एक एटीसी अधिकारी आणि राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळाचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे.