धूप रोखण्यासाठी वृक्षारोपण

। नेरळ । प्रतिनिधी ।

माथेरान या पर्यटनस्थळी मोठा पाऊस होत असतो आणि त्या पावसात मोठ्या प्रमाणात दरवर्षी माती वाहून जमिनीची धूप होते. जमिनीची धूप रोखण्यासाठी माथेरानमधील निसर्ग पर्यटन संस्थेने प्रेक्षणीय स्थळांच्या ठिकाणी माती थांबवून ठेवणार्‍या झाडांची लागवड करण्यात आली असून दरीजवळ असलेल्या ठिकाणी प्रामुख्याने हि झाडे लावण्यात आली.

माथेरानमध्ये दरवर्षी साधारण 5000 मिलीमीटर पाऊस पडत असतो. त्या पावसाच्या पाण्यासोबत माथेरानमधील लाल माती वाहून डोंगराखाली जात असते. त्यामुळे मातीसोबत अनेक झाडेदेखील जमिनीवर कोसळतात. परिणामी डोंगर ओसाड होत असल्याचे तसेच झाडांच्या आजूबाजूची माती वाहून गेल्याने झाडांच्या मुळ्या या जमिनीबाहेर पडल्याचे चित्र माथेरानमध्ये आहे. अशा झाडांची निगा राखण्यासाठी उपाययोजना करण्याची चर्चा मागील 20 वर्षे सुरु आहे. मात्र शासन, वन विभाग आणि पालिका यांच्याकडून कोणत्याही प्रकारची उपाययोजना करताना दिसत नाही.

त्यामुळे आपला डोंगर आपणच वाचविला पाहिजे यासाठी माथेरानमधील निसर्ग पर्यटन संस्था यांच्याकडून यावर्षातून पावसाळ्यातील चौथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने दरीजवळ माती वाहून जाऊ नये अशीच झाडे लावण्याचे उद्दिष्ट या संस्थेने ठेवले होते. या माध्यमातून प्रेक्षणीय स्थळे असलेल्या ठिकाणी निसर्ग पर्यटन संस्थेने वृक्षारोपण कार्यक्रम करताना असंख्य झाडे लावली.

Exit mobile version