केंद्रीय सचिव अमरदीप भाटिया यांची माहिती
। रायगड । खास प्रतिनिधी ।
महाराष्ट्र औद्योगिक कॉरिडोर विकास प्रकल्पाअंतर्गत महाराष्ट्रातील दिघी बंदराच्या विकासाला केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिली आहे. त्यानुसार दिघी पोर्ट इंटरस्ट्रीयल एरीया (डीपीआयए) एकूण सहा हजार 56 एकर इतक्या क्षेत्रात विकसीत केला जाणार आहे. त्यामध्ये खासगी तसेच सरकारी उद्योग उभारले जाणार असून 40 टक्के भागात वसाहत आणि 60 टक्क्यामध्ये औद्योगिक क्षेत्र उभारले जाणार असल्याची माहिती उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचे सचिव अमरदीपसिंग भाटिया यांनी दिली.
दिघी पोर्ट औद्योगिक क्षेत्राची पाहणी करण्यासाठी भाटीया हे शुक्रवारी माणगाव येथे आले होते. पाहणी करुन झाल्यानंतर त्यांनी विळे-भागाड येथील औद्योगिक क्षेत्रातील पोस्को कंपनीमध्ये पत्रकारांशी संवाद साधाल त्याप्रसंगी ते बोलत होते. दिघी पोर्ट औद्योगिक क्षेत्रामध्ये माणगाव आणि रोहा तालुक्यातील गावांचा समावेश आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत विकास होणार असून त्यामध्ये प्रामुख्याने अन्न व प्रक्रिया उद्योग, वस्त्रोद्योग, औषधनिर्माणशास्त्र, रासायनिक उद्योग, अभियांत्रिकी अशा स्वरुपाचे उद्योग उभारले जाणार आहेत, असे भाटिया यांनी स्पष्ट केले. गुंतवणुक क्षमता 38 हजार कोटींची राहाणार असून, या क्षेत्राच्या माध्यमातून प्रत्यक्ष रोजगार एक लाख 14 हजार 183 तसेच अप्रत्यक्ष रोजगार हा त्याच्या दुप्पट असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. सदरचा विकास हा पुढील साडेतीन वर्षामध्ये उभारला जाणार असल्याचे अपेक्षीत असल्याचे भाटिया यांनी सांगितले.
मुंबई शहरापासून दक्षिण दिशेला 170 किलोमीटर अंतरावर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर हे क्षेत्र वसलेले आहे. कोंकण रेल्वे मार्ग नजीक असल्याने या क्षेत्राला दळणवळणाच्या दृष्टीने दुहेरी लाभदायक ठरणार आहे. रायगड जिल्ह्याअंतर्गत भौगोलिक रचनेच्या दृष्टीने या क्षेत्राला दळणवळणाच्या व्यापक सुविधा उपलब्ध राहाणार आहेत. रस्ते मार्गाचा विचार केल्यास राष्ट्रीय महामार्ग 753 एफ माणगाव-पुणे तसेच राष्ट्रीय महामार्ग 66 मुंबई-गोवा महामार्ग हा या क्षेत्रापासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर आहे. तर राज्य महामार्ग क्रमांक 97 हा अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर आहे. रेल्वे मार्गाचा विचार केल्यास कोलाड या क्षेत्रापासून 5 किलोमीटर आणि इंदापुर व माणगाव अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर असल्याने लोहमार्गाने प्रकल्प जोडला जाण्यास सुविधा होणार आहे. हवाई मार्गाचा विचार केल्यास या ठिकाणाहून मुंबई विमानतळ 170 किलोमीटर, सध्या विकसीत होत असलेला नवी मुंबई विमानतळ 120 किलोमीटर आणि पुणे विमानतळ 116 किलोमीटर अंतरावर आहे. प्रकल्पांसाठी जलमार्गदेखील सुलभ असून, विविध बंदरे नजीकच आहेत. जेएनपीटी 104 किलोमीटर, मुंबई पोर्ट 153 किलोमीटर आणि दिघी पोर्ट 55 किलोमीटर अंतरावर आहे, अशी माहिती महाराष्ट्र इंडस्ट्रीयल लि.चे व्यवस्थापकीय संचालक पी.डी.मलीकनेर यांनी दिली.
याप्रसंगी नॅशनल इंडस्ट्रीयल कॉरीडोर डेव्हलप्मेंट कारपोरेशनचे मुख्यकार्यकारी अधिकारी तथा व्यवस्थापकीय संचालक रजतकुमार सैनी, एमआयडीसीचे सह मुख्यकार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.