| खांब-रोहा | वार्ताहर |
रोहे तालुक्यातील डोलवहाल बंधारा उजवा तिरातून शेतीसाठी आवश्यक पाणी पुरवठा कॅनॉलद्वारे केला गेलेल्या खांब विभागात लागवड करीत असलेल्या उन्हाळी हंगामातील भातशेतीच्या कामास दमदार सुरुवात झाली असल्याचे पहावयास मिळत आहे.
डोलवहाल बंधार्यातून शेतीसाठी पाणी उपलब्ध करून सुमारे 40 वर्षाहून अधिक काळ या विभागासह रोहे व माणगाव तालुक्यात उन्हाळी हंगामात उन्हाळी भातशेती पाणीपुरवठा केला जात आहे. त्याच पाणीपुरवठ्यावर उन्हाळी भातशेती पिकवून रोहे व माणगाव तालुक्यात उन्हाळी भातशेती हंगामात हरित क्रांती झाली. तर मागील सहा सात वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या कॅनॉलची डागडुजी व दुरुस्तीसाठी कालव्याचे शेतीसाठीचे आवश्यक पाणी बंद करण्यात आले होते. तर दुरूस्तीनंतर ते पुन्हा सुरू करण्यात आले. मधल्या कालावधीत भातशेती ओसाड, वाया जाऊ नये यासाठी कडधान्ये पिके घेणे सोईस्कर वाटल्याने आपापल्या शेतात कडधान्ये लागवड केली.
कडधान्ये पिके घेणे सोईस्कर वाटल्याने काही भागातील शेतकरी वर्गाने कॅनॉलचे पाणी शेतीसाठी घ्यायचे बंद केले. तर ज्या भागातील शेतकरी वर्गाने शेतीसाठी पाण्याची मागणी केली अशाभागात पूर्ववत भात लागवडीची कामे सुरू करण्यात आली आहेत. चालू उन्हाळी हंगामात देखील शेतीसाठी आवश्यक पाणी योग्य कालावधीत व मुदतीत प्राप्त झाल्याने, आवश्यक बि-बियाणांची लागवड करुन भात लागवडीसाठी रोपेही योग्य कालावधीत तयार झाल्याने सद्यस्थितीत लागवडीच्या कामास प्रारंभ करण्यात आला असल्र्याचे दिसून येत आहे. वाढती महागाई, बि-बियाणे व खते यांचे वाढते दर, मजुरांची वाढती मजूरी, ट्रॅक्टर व पॉवर ट्रेलरचे वाढते दर पाहता सद्यस्थितीत भातशेती पिकविणे अवघड असल्याचे शेतकरी वर्गाचे म्हणणे आहे. परंतू वडिलोपार्जित व्यवसाय व भातशेती वाया जाऊ नये, तसेच आपला हक्काचा व्यवसाय म्हणून भातशेतीचे पिक घेतले जात असल्याचे या विभागातील शेतकरी वर्गाचे म्हणणे आहे.