माथेरानच्या जंगलात प्लास्टिकचा खच

अडीच लाख बाटल्या सापडल्या
माझे गाव माझे पर्यावरण ही मोहीम यशस्वी

| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान मध्ये प्रेक्षणीय स्थळांच्या ठिकाणी जाणारे पर्यटक यांच्याकडून स्वच्छता नियमांची पायमल्ली केली जाते. त्यांच्याकडून मधील टाकण्यात आलेल्या प्लास्टिक कचरा आणि प्लास्टिक बाटल्या या पर्यावरण प्रेमी राकेश कोकळे आणि त्यांच्या सहकारी यांनी माझे गाव माझे पर्यावरण ही मोहीम यशस्वी करताना श्रमदान करून तब्बल अडीच लाख प्लास्टिक बॉटल या गोळा करून जंगलातून बाहेर काढल्या आहेत. दरम्यान,माथेरान मधील नागरिक आणि सरकारी कर्मचारी यांनी या मोहिमेच्या समारोप प्रसंगी राहून कौतुक केले.

माथेरान मधील अश्‍वपालक राकेश कोकळे हे गेली पाच वर्षे आपल्या सहकारी मित्रांना सोबत घेऊन माथेरान मधील जंगलं भागात आणि दरीमध्ये उतरून त्या ठिकाणी टाकण्यात आलेले प्लास्टिक तसेच प्लास्टिक बाटल्या या उचलून गोळा करीत असतात .यावर्षी त्यांनी ही मोहीम महसूल विभागाचे अधीक्षक दीक्षांत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविली.त्यात त्यांच्या टीम मधील सहकारी यांनी साथ देण्याचा निर्णय घेऊन जंगलात फिरून प्लास्टिक यांचा कचरा गोळा करण्याचा निर्णय घेतला होता. यावर्षी राकेश कोकळे यांनी ही मोहीम तब्बल आठ दिवस राबविली.त्यात त्यांनी अलेक्झांडर पॉईंट,वन ट्री हिल पॉईंट, लुईझा पॉईंट, सनसेट पॉईंट, मंकी पॉईंट, हार्ट पॉइंट,दस्तुरी नाका प्रवेशद्वार, लेकपॉईंट, कस्तुरबा रोड, दस्तुरी माथेरान शहर हा मुख्य रस्ता अशा बहुतेक सर्व ठिकाणी ही मोहीम राबविली. त्यासाठी राकेश कोकळे यांच्याबरोबर करण जानकर,अर्जुन जानकर, पंकज कोकरे,गणेश बिरामणे,शुभम सपकाळ,अनिकेत कोकरे,किशोर कासुरडे,दीपक रांजणे, राजेंद्र जाबरे,शैलेश ढेबे,जितेश कदम, राजेश जानकर,अनंता हवा,यांनी श्रमदान करून आठ दिवस जंगलात आणि दरीमध्ये उतरून प्लास्टिक बॉटल आणि कचरा उचलून दरी तसेच जंगलातून आणला.

या मोहिमेसाठी नगरपरिषद मुख्याधिकारी सुरेखा भणगे,पोलीस अधिकारी शेखर लव्हे आणि संयुक्त वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष योगेश जाधव यांनी अर्थसहाय्य केल्याने काही आदिवासी तरुण यांना रोजंदारीवर घेऊन कचरा गोळा करण्यास मदतीला घेतले. त्यात माथेरान डोंगरातील आदिवासीवाडी मध्ये राहणारे तरुण संदीप निरगुडे, राम उघडा, किसन उघडा,मनोज उघडा,योगेश पारधी,चंदन निरगुडे, देवा उघडा, गुरुनाथ उघडा,महेश उघडा,गोमा भस्मा, आकाश कोकला,राहुल बंगाली या तरुणांनी सहाय्य केल्याने ही मोहीम यशस्वी झाली.

नपातर्फे बाटल्यांवर प्रक्रिया
आठ दिवसांच्या तब्बल अडीच लाख प्लास्टिक बॉटल गोळा झाल्या असून या सर्व बॉटल माथेरान मधील अलेक्झांडर पॉइंट परिसरातील गोशाळा येथे एकत्र करण्यात आल्या.त्या प्लास्टिक बाटल्यांवर माथेरान नगरपरिषद विभागाकडून प्रक्रिया जाणार आहे.

हा सर्व प्लास्टिक कचरा माथेरान नगरपरिषदेकडे सुपूर्द करण्याच्या कार्यक्रमाला माथेरान मधील सामाजिक कार्यकर्ते आणि सरकारी अधिकारी उपस्थित होते.त्यावेळी राकेश कोकळे यांनी वन विभाग,वन व्यवस्थापन समिती, पोलीस विभाग आणि नगरपरिषद यांच्या सहकार्यामुळे ही मोहीम यशस्वी झाली असे सांगितले.त्यावेळी पोलीस अधिकारी शेखर लवहे, माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर,प्रेरणा सावंत,माजी नगरसेवक शिंदे,संदीप शिंदे,प्रकाश सुतार तसेच सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे, ज्ञानेश्‍वर बागडे,सुहासिनी शिंदे,वर्षा शिंदे, पोलीस उप निरीक्षक राजेंद्र मांडे,आदी उपस्थित होते.यावेळी ही मोहीम राबविण्याची वेळ येऊ नये यासाठी पर्यटकांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन प्रेरणा सावंत यांनी केले तर मनोज खेडकर यांनी माथेरान घाट रस्त्याच्या आजूबाजूला साचलेला प्लास्टिक कचरा स्वच्छता मोहीम राबवून करण्याची केली.

Exit mobile version