व्यापाऱ्यांनी सहकार्य करण्याचे पालिकेचे आवाहन
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरानमधील जंगल आणि पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी यंदाच्या पावसाळ्यापासून यूज अँड थ्रो स्वरूपातील प्लास्टिक रेनकोटवर बंदी घालण्याचा निर्णय माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेकडून कायम ठेवण्यात आला आहे. या निर्णयाला व्यापारी वर्गानेही सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे.
पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक माथेरानमध्ये येतात. वापरून फेकून दिले जाणारे प्लास्टिक रेनकोट जंगलात व रस्त्यांवर पडून राहिल्याने शहराचे विद्रूपीकरण होत असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले होते. यामुळे पर्यटन व नियोजन समितीचे सभापती शिवाजी शिंदे यांनी रेनकोट बंदीचा प्रस्ताव मांडला होता, तर नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी त्यास मंजुरी दिली. नगरपरिषदेत झालेल्या बैठकीत उपनगराध्यक्ष संतोष शेलार, मुख्याधिकारी राहुल इंगळे, सर्व नगरसेवक आणि व्यापारी मंडळाचे अध्यक्ष राजेश चौधरी उपस्थित होते. बैठकीत व्यापाऱ्यांनी पर्यावरण रक्षणासाठी पालिकेच्या निर्णयाला पाठिंबा दर्शविला. दरम्यान, यूज अँड थ्रो प्लास्टिक रेनकोटची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असून बंदीची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
