सत्ताधाऱ्यांच्या विकास दाव्यांवर टीका
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचे विदारक चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. तालुक्यातील जिल्हा परिषद बापवली गावच्या प्राथमिक शाळेला पावसाच्या पाण्याची प्रचंड गळती लागली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गात बसून शिक्षण घेणे मुश्किल झाले होते. अखेर मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी एकत्र येत शाळेच्या छपरावर प्लास्टिक टाकून तात्पुरता आसरा दिला आहे. या प्रकारामुळे मतदारसंघातील सत्ताधारी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाविरोधात नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बापवली जिल्हा परिषद शाळेच्या छतातून वर्गामध्ये पाणी गळत होते. वर्गखोल्यांमध्ये पाणी साचत असल्याने लहान मुलांना कुठे बसवायचे, असा यक्षप्रश्न शिक्षकांसमोर निर्माण झाला होता. पावसाच्या पाण्यात पुस्तके भिजणे आणि आजारपण पसरण्याची भीती यामुळे मुलांचे शिक्षणच धोक्यात आले होते. प्रशासकीय स्तरावर तातडीने कोणतीही मदत न मिळाल्याने, अखेर बापवली गावातील गावकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेतला. स्वतःच्या पदरचे पैसे आणि श्रमदान करून ग्रामस्थांनी संपूर्ण शाळेच्या इमारतीवर प्लास्टिकचे आच्छादन टाकले, जेणेकरून मुले आत सुरक्षितपणे शिकू शकतील. गावकऱ्यांच्या या कृतीने प्रशासकीय व्यवस्थेला एक प्रकारे चपराक लगावली आहे.
