। बोर्लीपंचतन । वार्ताहर ।
श्रीवर्धन तालुका पंचायत समिती आणि गोखले शिक्षण संस्था संचलित न्यु मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल आराठी यांच्या संयुक्त विद्यमाने 52 व्या श्रीवर्धन तालुका विज्ञान प्रदर्शनचा बक्षिस वितरण समारंभ गुरुवारी (दि.9) संपन्न झाला. यावेळी, विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय ‘शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान’ हा होता. हे प्रदर्शन प्राचार्य डॉ. श्रीनिवास जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली, गट शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, पंचायत समिती यांच्या अध्यक्षतेखाली व प्रा. किशोर लहारे, मुख्याध्यापिका वैशाली सावंत यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाले.
या विज्ञान प्रदर्शनाला श्रीवर्धन पोलीस ठाण्याच्या डी.वाय.एस.पी. सविता गर्जे यांनी आवर्जून उपस्थिती लावली होती. त्यांनी सर्व विज्ञान प्रकल्पांची पाहणी करुन प्रदर्शनात सहभागी विद्यार्थांशी संवाद साधत स्पर्धकांचे कौतुक केले. यावेळी बोलताना रमेश चव्हाण यांनी आयोजकांना धन्यवाद देत सहभागी विद्यार्थी, विज्ञान व शाळा शिक्षक, केंद्रप्रमुख, गणित अध्यापक मंडळ आणि स्पर्धापरिक्षक या सर्वांचे कौतुक केले. तसेच, परिक्षक, शिक्षक आणि स्पर्धक विद्यार्थ्यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नवज्योत जावळेकर यांनी केले. तर, शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली सावंत यांनी बक्षिस वितरण कार्यक्रमाला आलेल्या सर्व मान्यवर, अतिथी व प्रदर्शनात सहभागी विज्ञान शिक्षक, विद्यार्थी, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी या सर्वांचे आभार मानले.