प्रवाशांच्या जीवाशी खेळ; वारंवार रस्त्यात एसटीचा बिघाड

गळतीसह खिडक्या तुटलेल्या

। अलिबाग । प्रतिनिधी ।

सर्वसामान्यांची जीवनवाहिनी समजली जाणारी एसटी आता जीवघेणी वाहिनी बनू लागल्याचे चित्र समोर येत आहे. सतत एसटीमध्ये बिघाड, ब्रेक फेल होणे, एसटीच्या छपरातून पाण्याची गळती, खिडक्या तुटलेल्या, जुन्या इंजिनच्या गाड्यांना रंगरंगोटी करून रस्त्यावर पाठविणे अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या जिवाशी खेळ खेळला जात असल्याचा आरोप केला जात आहे.

एसटी महामंडळ रायगड विभागाच्या अखत्यारित अलिबाग, पेण, कर्जत, महाड, माणगाव, श्रीवर्धन, रोहा, मुरूड ही आठ आगार असून, 19 बसस्थानके आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये 377 हून अधिक एसटी बसेस आहेत. यातील दीडशे एसटी बसेसची वयोमर्यादा आठ वर्षांपेक्षा जास्त आहे. या बसमधून धूर मोठ्या प्रमाणात निघतो. प्रदूषण रोखण्यासाठी रायगड जिल्ह्यातील या बसेसला मुंबईत प्रवेश बंद केला आहे. त्यामुळे रायगडसह अन्य जिल्ह्यात या बस धावत आहेत. प्रदूषणामुळे पर्यावरणावर त्याचा परिणाम होतो. मानवी आरोग्यदेखील बिघडत आहे. धूर काढणार्‍या या दीडशे गाड्यांवर भरोसा ठेवून लाखो प्रवासी प्रवास करतात.

जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस सुरु आहे. एसटी बसला गळती लागली आहे. पावसाचे पाणी बसमध्ये पडत असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. एसटी बसच्या खिडक्या तुटलेल्या असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. अनेक वेळा छत्री, रेनकोट आधार घेत प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे.
एसटीला गळती लागू नये यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात. त्यामुळे खर्च नक्की कुठे केला, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यातील अनेक बसेेस सतत रस्त्यात बंद पडत आहेत. ब्रेक न लागणे, एक्सल तुटणे, अशा अनेक प्रकारच्या घटना घडत आहेत. त्याबाबत चालकांकडून तक्रारी केल्या जातात. मात्र, त्यावर योग्य ती कार्यवाही केला जात नाही, असे बोलले जात आहे. जिल्ह्यातील एसटीच्या गलथान कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. याकडे विभाग नियंत्रक दिपक घोडे यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

सीएनजी पंपाचे काम संथगतीने
अलिबाग एसटी बस आगारात सीएनजीवर चालणार्‍या बसेस लवकरच दाखल होणार आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून स्थानकात सीएनपी गॅस पंप उभारण्याचे काम सुरु आहे. मात्र, अद्यापपर्यंत हे काम पूर्ण झाले नाही. सीएनजी पंपाचे काम संथगतीने चालू आहे. सीएनजीवर चालणार्‍या बसेसची प्रवाशांना प्रतीक्षा लागून राहिली आहे.
57 बसेस भंगारात
रायगड जिल्ह्यात 377 एसटी बसेस आहेत. या बसेसपैकी 57 एसटी बसेस 15 वर्षांपेक्षा अधिक वयोमर्यादा झाली आहे. त्यामुळे या बसेस रस्त्यावर धावण्यालायक नसल्याची माहिती विभाग नियंत्रक कार्यालयाकडून देण्यात आली आहे. या बसेस भंगारात गेल्या आहेत.

जिल्ह्यात 377 बसेस आहेत. लवकरच सीएनजीवर चालणार्‍या 300 बसेस दाखल होतील. अलिबाग स्थानकातील सीएनजी पंपाचे काम अंतिम टप्प्यात असून, महिनाअखेरपर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

संदीप शिंदे, यंत्र अभियंता,
विभाग नियंत्रक कार्यालय, रायगड

Exit mobile version