पोषण आहारात सापडल्या उंदराच्या लेंड्या, पक्ष्यांची पिसे; डाळींचा भुसा, मिरची पावडर, हळदीचा बेरंग
| पेण | प्रतिनिधी |
शाळांमध्ये मुलांची उपस्थिती असणे, त्यांना चांगले शिक्षण आणि पोषक आहार मिळावा या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या शालेय पोषण आहारातील तांदळात पक्ष्यांची पिसे, अळ्या अन् उंदराच्या लेंढ्या आढळून आल्या. शाळकरी मुलांना दिल्या जाणार्या पोषण आहारातील ही धक्कादायक बाब बघून पालकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. याबाबतची माहिती देण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी बास्टेवाड यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी मी मिटींगमध्ये असल्याचे सांगत बोलणे टाळले. विद्यार्थ्यांच्या आरोग्यापेक्षा अधिकार्यांना बैठका महत्त्वाच्या वाटत असल्याने पालकांमधून संताप व्यक्त होत आहे.
शासन नियमानुसार मध्यान्न भोजन आहार ही योजना गेली कित्येक वर्ष सुरू आहे. मात्र, मधल्या काळात या योजनेमध्ये अनेक फेरबदल झाले. आणि धान्य पुरवठा करणार्या ठेकेदाराने याचाच फायदा घेऊन खूप सारा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मधल्या काळात मुलांना धान्य दिले जात होते. परंतु, हे धान्य पूर्णतः निकृष्ट दर्जाचे असल्याचे बोलले जात होते. परंतु, गेली दोन वर्षे जिल्हा परिषदेवर प्रशासक असल्याने ना अधिकारी तोंड उघडत आहेत, ना मुख्याध्यापक. याचा फायदा हा ठेकेदाराला होत आहे. आणि ठेकेदाराने हीच बाब आता कायम ठेवली असून, धान्य देताना वेळेवर न देणे, योग्य प्रमाणात धान्य न देणे, निकृष्ट दर्जाचे धान्य देणे, असा सारा प्रकार सध्या सुरू आहे, अशी चर्चा आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, जे धान्य पुरविले जाते, त्या धान्याच्या दराचा विचार केला तर सर्वसामान्यांना शॉक लागल्याशिवाय राहणार नाही. मुगडाळ 103 रुपये किलो, तुरडाळ 102 रुपये किलो, मसुरडाळ 102 रूपये किलो, हरभरा 82 रुपये किलो, चवळी 95 रुपये किलो, मटकी 105 रुपये किलो, मूग 89 रुपये किलो, वटाणा 95 रुपये किलो, कांदा लसूण मसाला 197 रुपये किलो, हळद पावडर 197 रुपये किलो, मीठ 14 रुपये किलो, जिरे 250 रुपये किलो, मोहरी 94 रुपये किलो, मिरची पावडर 192 रुपये किलो, गरम मसाला 192 रुपये किलो अशाप्रकारे दर आहेत. मात्र, वटाणा जर पाहिलात तर मुगाएवढाच लहान-लहान तर, चवळी, हरभरा याला पाखरे लागलेली आहेत. तर मुगडाळ, तुरडाळ, मसुरडाळ यामध्ये डाळ कमी आणि भुसा व कडधान्यांची टरफले जास्त, मिरची पावडरची अवस्था तर दयनीयच, हळद पिवळी नसून राखाडी रंगाचीच, गरम मसालाला कोणताच वास नसून फक्त चॉकलेटी कलरची भुकटी, जिरे, मोहरी याकडे तर न पाहणेच चांगलेच, मिठाची अवस्थाही न बोलण्यासारखीच आणि तांदळाच्या पोत्यात तर कणीसोबत पक्ष्यांची पिसे, उंदरांच्या लेंढ्या असा सर्वप्रकार सध्या समोर येत आहे.
बचत गटाच्या प्रमुखाने मुख्याध्यापकांकडे तक्रार केल्यानंतर मुख्याध्यापकांचे ठरलेले उत्तर ते काय आमच्या घरी पिकते का? जर मुख्याध्यापकांची अशी बोलणी असेल, तर पोषण आहार शिजवणार्या बचत गटांनी काय करायचे? शासनाच्या बेजबाबदारपणाचा फटका पोषण आहार शिजवून देणार्या बचत गटांना बसू शकतो. भविष्यात जर एखादी दुर्दैवी घटना घडली तर मुख्याध्यापक तथा शासनाचे अधिकारी हात वर करुन मोकळे होतील. परंतु, खरी जबाबदारी ही शासनाच्या अधिकार्यांची व मुख्याध्यापकांची आहे. येणारे धान्य हे योग्य प्रकारे येत आहे की नाही, त्याचा दर्जा कोणत्या प्रकारचा आहे. जर ठेकेदाराला योग्य दर मिळत असेल, तर त्याने मालही योग्य व चांगल्या प्रतीचा देणे, हे त्याचे कर्तव्य तथा जबाबदारी आहे. परंतु असे होत नाही. त्यामुळे निकृष्ट दर्जाचा पोषण आहार विद्यार्थ्यांना खावा लागत आहे. असे असतानादेखील निकृष्ट दर्जाचे धान्य पुरवणार्या ठेकेदारावर कारवाई होत नाही. तसेच सध्या काही ठिकाणी ग्रामीण भागामध्ये ठेकेदाराने धान्य न पुरविल्याने मुख्याध्यापक स्वतःची आयडीयाची कल्पना लावून जुने निकृष्ट दर्जाचा सामान वापरताना दिसत आहेत. अशा प्रकारच्या निकृष्ट दर्जाचे सामान स्वतःच्या घरी वापरतील का? असा सवाल पालकवर्गातून होत आहे. मुख्याध्यापक निकृष्ट दर्जाच्या धान्याची तक्रार का करत नाहीत, हादेखील विचार करणारा प्रश्न आहे. ग्रामीण भागात बिंधास्तपणे राहिलेला मार्च-एप्रिलचा धान्य वापरत आहेत. या धान्याची व सामानाची अवस्था उकिरड्यावर टाकण्याएवढी वाईट आहे. असे असताना ग्रामीण भागात हेच धान्य शिजवले जात आहे. याकडे ना गटशिक्षण अधिकार्यांचे लक्ष, ना जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकार्यांचे. सर्व कसं आलबेल सुरू आहे.
खरंच असा आहार पोषण ठरेल? वटाणा जर पाहिलात तर मुगाएवढाच लहान-लहान तर, चवळी, हरभरा याला पाखरे लागलेली आहेत. तर मुगडाळ, तुरडाळ, मसुरडाळ यामध्ये डाळ कमी आणि भुसा व कडधान्यांची टरफले जास्त, मिरची पावडरची अवस्था तर दैनीयच, हळद पिवळी नसून राखाडी रंगाचीच, गरम मसालाला कोणताच वास नसून फक्त चॉकलेटी कलरची भुकटी, जिरे, मोहरी याकडे तर न पाहणेच चांगलेच, मिठाची अवस्थाही न बोलण्यासारखीच आणि तांदळाच्या पोत्यात तर कणीसोबत पक्ष्यांची पिसे, उंदरांच्या लेंढ्या असा सर्वप्रकार सध्या समोर येत आहे.
सीईओंनी बोलणे टाळले निकृष्ट धान्याबाबत रायगड जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. भरत बेस्टेवाड यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही. मात्र, एक टेक्स मेसेज पाठवला की माफ करा, मी आता बोलू शकत नाही. अधिकारीवर्गाला विद्यार्थ्यांच्या आरोग्यापेक्षा त्यांच्या बैठका महत्त्वाच्या वाटतात. याबाबत पालकवर्गातून चीड व्यक्त होत आहे.