सीसीटीव्ही अन् पथदिवे बंद
| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल शहरात वीज व्यवस्थापनाच्या नावाखाली वाहतूक सिग्नल, सीसीटीव्ही कॅमेरे आणि पथदिव्यांच्या वीजपुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सकाळी 6.00 ते सायंकाळी 7.30 या वेळेत पथदिव्यांच्या जोडण्या बंद ठेवल्या जात असल्याने त्याच जोडण्यांवर अवलंबून असलेले सिग्नल आणि सीसीटीव्ही कॅमेरेही बंद पडत असल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी, वाहतूक नियंत्रण आणि शहराच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, महावितरण आणि पनवेल महापालिकेतील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर आला आहे.
पनवेल शहरातील सिग्नल आणि पथदिवे बंद पडल्याने महापालिकेने वीजबिले भरली नाहीत का, असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, महापालिकेच्या विद्युत विभागाने पथदिव्यांची बिले नियमित भरली जात असल्याचे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे, महावितरणच्या म्हणण्यानुसार, राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ कार्यालयाच्या निर्देशानुसार लोड मॅनेजमेंट केले जात आहे. त्यामुळे हा प्रश्न थकीत बिलांचा नसून वीजजोडण्यांच्या नियोजनाचा असल्याचे स्पष्ट होत आहे. महावितरणकडून पथदिव्यांच्या जोडण्या स्वयंचलित पद्धतीने बंद केल्या जात असल्याने त्याच जोडण्यांवरून वीज घेणारे वाहतूक सिग्नल आणि सीसीटीव्ही कॅमेरेही बंद पडत आहेत. अत्यावश्यक यंत्रणांसाठी स्वतंत्र वीजजोडणीची व्यवस्था नसल्याने हा गोंधळ निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या जोडण्यांचा तपशील मिळवून अत्यावश्यक सेवांचा वीजपुरवठा स्वतंत्र ठेवण्यासाठी महावितरणने महापालिकेकडून यादी मागवली आहे.
