नवीन बसस्थानक उभारण्याची खांबवासियांची मागणी
| कोलाड | वार्ताहर |
मुंबई-गोवा महामार्गांवरील खांब नाक्यावरील अनेक वर्षांपासून बसस्थानक होते. परंतु, महामार्गाच्या चौपदरीकरणात ते जमीनदोस्त करण्यात आले आहे. या गोष्टीला आता 17 वर्षे झाली तरी त्याच्या जागी अद्यापही नवीन बसस्थानक बांधण्यात आले नाही. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्यामुळे खांब नाक्यावर नवीन बसस्थानक उभारण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. मुंबई-गोवा महामार्ग 66 वरील खांब नाक्यावर गेली अनेक वर्षांपासून बस स्थानक जणू गायब झाला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे येथे बसस्थानक नसल्यमुळे महामंडळाच्या लांब पल्ल्याच्या एसटी बसेस थांबणे सोडाच, तर रायगडमधील एसटी बसेस थांबत नसल्याने खांबकडून कोलाडकडे तसेच खांबकडून नागोठणे, पालीकडे जाणारे कॉलेज व उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे.
खांब नाक्यावर बाहे, देवकान्हे, धानकान्हे, चिल्हे, तळवली, नडवली, खांब, वैजिनाथ, शिरवली, मुठवली, गोवे, पुगाव, मढाळी ते बळे गरबटपर्यंत वाड्या-वस्त्या धरून 20 ते 25 गावांतील विद्यार्थी, तसेच प्रवासी नागरिक मुंबईकडे अथवा महाडकडे जाण्यासाठी येत असतात; परंतु खांब नाक्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला बसस्थानक नसल्याने येथे कोणत्याही एसटी बसेस थांबत नाही. तर, एखादी मुंबईकडून येणारी बस थांबली तर तिकीट मात्र वरसगावचे देतात. जर बस थांबली नाही, तर वरसगाववरून परत खांबकडे येण्यासाठी परत तिकीट काढावे लागत आहे. याचा संबंधितांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी गायब झालेले बसस्थानक बांधून येथे येणाऱ्या-जाणाऱ्या एसटी बसेस थांबव्या यासाठी संबंधित शासन, प्रशासन, स्थानिक सामाजिक कार्यकर्ते यांनी तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
बसस्थानक तोडण्याला 17 वर्षे झाली, तरी येथे बस स्थानक बांधण्यात आले नाही. यामुळे प्रवाशांना उन्हपावसात रस्त्यावर उभे राहावे लागत आहे. रक्षाबंधनासाठी निघालेल्या महिलांना तीन ते चार तास गाड्यांची वाट पाहावी लागली. जर एसटी बस थांबत नसेल, तर महिलांना भाड्यात सूट देण्याला अर्थ आहे का?
अलंकार खांडेकर, सामाजिक कार्यकर्ते