टीईटी परीक्षा रद्द; पनवेलमध्ये 10 हजार उमेदवारांची तयारी वाया
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने रविवारी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटीच्या प्रकारामुळे पुढील आदेशापर्यंत रद्द करण्यात आली. भिवंडी येथे एका व्यक्तीकडे टीईटी प्रश्नपत्रिकेतील प्रश्नसंच आढळल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे राज्यभरातील लाखो परीक्षार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
पनवेल तालुक्यात या परीक्षेसाठी सुमारे दहा हजार उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यांच्यासाठी नऊ परीक्षा केंद्रांवर आसनव्यवस्था करण्यात आली होती. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सुमारे 350 कर्मचारी आणि नऊ केंद्रप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली होती, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी साहू सतपाल यांनी दिली.
डी.एड. आणि बी.एड. पूर्ण केल्यानंतरही शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य असल्याने उमेदवारांनी मोठी तयारी केली होती. मात्र, पेपरफुटीमुळे परीक्षा रद्द झाल्याने त्यांचा मानसिक, आर्थिक आणि वेळेचा मोठा फटका बसल्याची भावना उमेदवारांनी व्यक्त केली.
दरम्यान, या प्रकारामुळे शिक्षण विभागाच्या परीक्षा व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून पेपरफुटीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी उमेदवारांकडून होत आहे. तसेच काही संघटना आणि उमेदवारांकडून या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही करण्यात येत आहे.
पेपरफुटीचा पर्दाफाश
रविवार, 28 जून रोजी होणाऱ्या टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका दीड कोटी रुपयांना विकण्याचा कट भिवंडी पोलिसांनी उधळून लावला. कोनगाव परिसरातून राजीव शाह (रा. बिहार), आकाश कुमार सरोजकुमार (रा. बिहार) आणि धीरज बलराज सिंग (रा. हरियाणा) या तिघांना अटक करण्यात आली. आरोपींकडून टीईटी परीक्षेच्या मूळ प्रश्नपत्रिकेचे चार संच, मोबाईल आणि डेबिट कार्डे जप्त करण्यात आली असून, मुख्य सूत्रधार अद्याप फरार आहे. या प्रकरणानंतर टीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून, विशेष तपास पथक या संपूर्ण रॅकेटचा तपास करत आहे. या पथकात 2 एसीपी, 9 पोलीस निरीक्षक आणि 20 कर्मचाऱ्यांचा समावेश असून, दिल्ली-बिहार कनेक्शन शोधण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.





