| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल तालुक्यातील रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ रॉकेल विक्रेत्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी पनवेल रास्त भाव धान्य दुकान व रॉकेल विक्रेते संघटनेने केली आहे. या संदर्भात संघटनेचे अध्यक्ष भरत पाटील यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांना निवेदन देण्यात आले. मार्च 2026 मध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दुकानदारांच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, जवळपास तीन महिने उलटूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार, बायोमेट्रिक प्रणालीतील अडचणींमुळे अनेक लाभार्थी धान्यापासून वंचित राहत आहेत. तसेच, धान्य व रॉकेल परवान्यांच्या नूतनीकरणास होणारा विलंब, वाहतूक ठेकेदारांकडून पुरविल्या जाणाऱ्या धान्याच्या वजनातील तफावत, वेळेवर धान्य कोटा उपलब्ध न होणे आणि थकीत कमिशन यांसारख्या समस्यांमुळे दुकानदार आर्थिक संकटात सापडले आहेत.







