रुग्णवाहिकेअभावी रुग्णांचे हाल
| मुंबई | प्रतिनिधी |
महाड तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील आरोग्य व्यवस्था सध्या गंभीर संकटात सापडली असून, रुग्णवाहिकांच्या तीव्र कमतरतेमुळे स्थानिकांना मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. एकीकडे आरोग्य सेवा आपल्या दारी असल्याचा गाजावाजा होत असताना, दुसरीकडे मात्र या दुर्गम भागातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत देवावर हवाला ठेवून राहावे लागत आहे.
खाडीपट्ट्यातील डोंगराळ आणि विखुरलेल्या वाडीवस्त्यांमध्ये गंभीर आजारी रुग्ण, गरोदर माता, अपघातग्रस्त आणि सर्पदंश, विंचूदंश झालेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. अशा परिस्थितीत रुग्णांना तातडीने महाड ग्रामीण रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालयात हलवणे आवश्यक असते. मात्र, हक्काची रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध होत नसल्याने अनेकदा रुग्णांची स्थिती गंभीर होते. महाड तालुक्यात सुसज्ज असे रुग्णालय नसल्यामुळे माणसांची त्रेधा तिरपीट होते.
ग्रामीण भागात एकेकाळी आधार असलेल्या एसटी बसेसच्या फेऱ्याही दिवसें दिवस कमी होत चालल्या आहेत. त्यामुळे पर्यायी वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. रुग्णवाहिका मिळत नसल्याने ग्रामस्थांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. याचाच फायदा घेऊन खाजगी वाहनचालक अव्वाच्या सव्वा भाडे आकारत असल्याने गरिबांच्या खिशाला मोठी कात्री लागत आहे.
अपघाताच्या वेळी किंवा रात्री-अपरात्री कोणाची प्रकृती बिघडली तर गाडी शोधण्यातच अर्धा-एक तास जातो. हक्काची शासकीय रुग्णवाहिका या विभागासाठी स्वतंत्रपणे उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
