सुधागडात शालेय विद्यार्थ्यांची फरफट

जलद उपाययोजना करण्याची मनसेची मागणी

| पाली/बेणसे | वार्ताहर |

सुधागड हा आदिवासी बहुल तालुका आहे. येथील गाव खेड्यापाड्यातील, डोंगर माळरान पठारावरील असंख्य विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी मोठी कसरत करतात. नानोसे ते परळी दरम्यान सकाळच्या खोपोली-पाली एसटीमध्ये जागा उपलब्द होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पोहचण्यासाठी महामार्गावरून स्वतःचा जीव धोक्यात घालून उन्हातान्हात पायी पायपीट करावी लागते. शालेय विद्यार्थ्यांची एसटी महामंडळाकडून होणारी गैरसोय तसेच, फरफट थांबविण्यासाठी जलद उपाययोजना करण्याची मागणी सुधागड तालुका मनसेच्या महिला अध्यक्षा हर्षदा शिंदे व पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. एसटी महामंडळ पालीचे आगार व्यवस्थापकांना मागणीचे निवेदन देऊन जलद कार्यवाही करण्याची विनंती करण्यात आली.

सदर निवेदनात नमूद केले आहे की को.ए.सो प्रभाकर रामचंद्र गावंड विद्यालय परळी व आत्मोन्नती विद्यामंदिर जांभुळपाडा या शाळेतील विद्यार्थी रोज सकाळी 9.30 ते 10.30 या वेळेत नानोसे बसस्थानकात शाळेत जाण्यासाठी उभे असतात. सकाळच्या वेळेत खोपोलीकडून पालीकडे जाणारी एसटी प्रवाशांनी खचाखच भरून येते. त्यामुळे नानोसे बसस्थानकातून अर्ध्या मुलांनाच एसटीमध्ये जागा मिळते. ज्यांना एसटीत जागा मिळत नाही ते विद्यार्थी पाली-खोपोली राज्य महामार्गावरून आपला जीव धोक्यात घालून नानोसे ते परळी 2 की. मी पायी प्रवास करतात. या सर्वांचा परिणाम विद्यार्थ्यांच्या प्रकृतीवर होऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ही समस्या विद्यार्थ्यांना अधिक त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे सकाळी 9.30 ते 10.30 व संध्याकाळी 4.30 ते 5.30 या वेळेत एसटीमध्ये मुलांना राखीव जागा ठेवण्यात यावी अथवा वाढीव एसटी बस सेवा देण्यात यावी, अशी करण्यात आली आहे. दरम्यान, मागणीची जलद पूर्तता करावी अन्यथा आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल असा इशारा मनसेच्या सुधागड तालुका अध्यक्ष हर्षदा शिंदे यांनी दिला आहे.

निवेदन देते समयी सपना राऊत पाटील, स्नेहल शिंदे, अंब्रपाली शिंदे, रिया कदम, पुष्पा शिंदे, लीला कदम, नीलिमा वाघचौरे, रमण शिंदे महिला उपस्थित होत्या.

Exit mobile version