पालीतील भोर संस्थांनच्या वास्तुला अवकळा

तुटलेल्या खोल्यांमध्ये दारूचा अड्डा व मुतार्‍या

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

पाली येथील रामआळी जवळ भोर संस्थानिकांची कचेरी तसेच ब्रिटिशकालीन जुने पोलीस स्थानक, तहसील व उपलेखा कार्यालय आणि न्यायालयाची वास्तू पूर्णपणे मोडकळीस आली आहे. या ब्रिटिश कालीन ऐतिहासिक वास्तूचे अक्षरशः खंडरमध्ये रूपांतर झाले आहे. येथील तुटलेल्या खोल्या आता मुतार्‍या झाल्या आहेत. तिथे अवैध धंदे देखील सुरू असल्याने ही वास्तू नगरपंचायतकडे हस्तांतरित करावी, अशी मागणी पाली नगरपंचायतने संबंधित प्रशासनाकडे केली आहे.

येथील सर्व कार्यालये काही वर्षांपूर्वीच इतर नवीन इमारतीत हालविण्यात आली आहेत. भोर संस्थानाचे संस्थानिक पंतसचिव यांच्याकडे या कार्यालयाची कारभार पाहण्याची जबाबदारी ब्रिटिशांनी दिली होती, असे इतिहास अभ्यासकांचे म्हणणे आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते जवळपास 2002 ते 2003 पर्यंत येथे कोर्ट, पोलिस स्थानक व उपलेखा कार्यलय सुरू होते. त्यावेळी या वास्तूची योग्य देखभाल आणि देखरेख होत होती. त्यांनतर मात्र येथे कोणतेच सरकारी कार्यालय राहिले नसल्याने ही ऐतिहासिक वास्तू दुर्लक्षित झाली.

स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडात या वास्तूने कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी चोख व भक्कमपणे पार पाडली. तसेच अनेक स्थित्यंतरे पहिली आहेत. शहराच्या मध्यवर्ती असलेल्या या वास्तूचा एक वेगळाच दबदबा होता. या वास्तूचे बांधकाम दगडी चिरेबंदी व विटांचे आहे. मात्र आता इथे सर्व पडझड झाली आहे. पाण्यामुळे भिंती फुगल्या आहेत. पायर्‍या दरवाजे व खिडक्या तुटल्या आहेत. छत देखील तुटले आहे. अनेक जण येथे लघवी करण्यासाठी येतात. त्यामुळे इथे संपूर्ण दुर्गंधी पसरली आहे. येथे इतर गैरप्रकार देखील चालतात. काही जण मद्यपान करण्यासाठी देखील येथे येतात. प्रशासनाचे या महत्वाच्या वास्तुकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे.

ही ऐतिहासिक वास्तू आहे. मात्र तिची मोठ्या प्रमाणात पडझड व दुरावस्था झाली आहे. तसेच परिसर देखील घाण झाला आहे. प्रशासनाचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष आहे. त्यामुळे या जागेचा योग्य कामासाठी वापर करण्यात यावा तसेच नियमित देखरेख केली जावी.

कपिल पाटील
सामाजिक कार्यकर्ते, पाली

येथील वस्तू धोकादायक स्थितीत आहेत. मात्र या मोक्याच्या जागेचा योग्य प्रकारे वापर होणे आवश्यक आहे. नगराध्यक्षा गीता पालरेचा यांच्या नेतृत्वाखाली या जागेचे नगरपंचायतकडे हस्तांतरण व्हावे यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. नगरपंचायत जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे नगरपंचायत कार्यालयासाठी व व्यापारी संकुल उभारण्यासाठी ही जागा मिळाल्यास त्याचा सुयोग्य वापर होईल. सद्यस्थितीत या वास्तूत कोणीही अनुचित प्रकार करू नयेत.

आरिफ मणियार
उपनगराध्यक्ष, पाली
Exit mobile version