भिंत ढासळली; दुर्घटनेचा धोका
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
रामआळीजवळ ब्रिटिशकालीन ऐतिहासिक वास्तू आहे. सध्या या वास्तूची पूर्णपणे वाताहत झाली आहे. पावसामुळे या वास्तूच्या रस्त्याच्या बाजूकडील भिंत ढासळली आहे. छत कोसळले आहे. तसेच येथील सर्व भिंती व छत कमकुवत झाले आहे. काही ठिकाणच्या दगड व विटा निखळल्या आहेत. परिणामी, या मार्गावरून प्रवास करणे आता धोकादायक झाले आहे.
या ब्रिटिशकालीन वास्तूमध्ये पूर्वी पोलीस स्थानक, तहसील व उपलेखा कार्यालय आणि न्यायालय होते. काही वर्षांपासून ही सर्व कार्यालये बंद करून दुसरीकडे हलविण्यात आली आहेत. सद्यःस्थितीत या वास्तूचे अक्षरशः खंडरमध्ये रूपांतर झाले आहे. या वास्तूची अशी दुरवस्था झालेली पाहून नागरिकांकडून चिंता व दुःख व्यक्त केले जात आहे. येथे छतावर झाडदेखील कोलमडून पडले आहे. दारे-खिडक्या तुटल्या आहेत. येथील तुटलेल्या खोल्या आता मुतार्या झाल्या आहेत. तिथे अवैध धंदेदेखील सुरू असतात. अशाच प्रकारे ही जीर्ण वास्तू जर ढासळत राहिली, तर ती नामशेष होईल तसेच दुर्घटनादेखील घडू शकते.
ही वास्तू सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली आहे. त्यामुळे नगरपंचायतमार्फत येथे कोणतीही दुरुस्ती किंवा काम करता येत नाही. मात्र, त्यांच्याकडे याबाबत पत्रव्यवहार केला होता. त्यांनी सांगितले की, तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पत्रव्यवहार करा. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला आहे. त्यांची परवानगी मिळाल्यास या वास्तूची दुरुस्ती किंवा ती घातक भिंत हटविण्यात येईल. या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने माहिती फलक लावण्यात आले आहेत. वाहने व नागरिकांनी येथून जाताना खबरदारी घ्यावी.
– प्रणाली शेळके, नगराध्यक्षा, पाली
या ब्रिटिशकालीन वास्तूचे योग्य प्रकारे संरक्षण आणि संवर्धन होणे गरजेचे आहे. सतत अशाप्रकारे ही वास्तू ढासळत असेल तर दुर्घटनादेखील घडू शकते. त्यामुळे प्रशासनाने वेळीच खबरदारी घेऊन योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे.
– शंतनू लिमये, तरुण, पाली