। पनवेल । वार्ताहर ।
मर्चेंट नेव्हीमध्ये काम करणाऱ्या एका तरुणाची ऑनलाइन लूट झाली आहे. त्याच्याकडून तीन दिवसांत 19 लाख 11 हजार रुपयांची रक्कम भामट्यांनी उकळली आहे. याबाबत कळंबोली पोलीस अधिक तपास करीत आहेत.
कळंबोली येथील एलआयजी या बैठ्या चाळीत राहणारा तरुण मर्चेंट नेव्हीमध्ये नोकरी करतो. नुकताच त्याचे काम संपल्यामुळे त्याने पुन्हा नवीन कामासाठी अर्ज करत प्रक्रिया सुरू केली होती. या दरम्यान त्याला घरबसल्या संगणकावर काम करून उत्पन्न मिळविण्याची जाहिरात इंटरनेटवर दिसली. या जाहिरातीमध्ये घरातून करता येईल असे काम देण्यात आले. सुरुवातीला पहिल्या दिवशी या तरुणाने केलेल्या कामामुळे भामट्यांनी त्याला ऑनलाइन कामातून उत्पन्न म्हणून तातडीने त्याच्या बैंक खात्यात रक्कम जमा केली. त्यामुळे आमिषाला बळी पडल्याने तरुणाने स्वतःकडची मोठी रक्कम या कामामध्ये गुंतवली. ही गुंतवलेली रक्कम परत न मिळाल्याने तसेच, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने कळंबोली पोलिसांत धाव घेत तक्रार केली.