वडगावमध्ये बोगस एनएच्या नावावर प्लॉट विक्री

दलालांच्या भूलथापांना बळी पडू नका- पेणकर

| पेण | प्रतिनिधी |

आयुष्यात प्रत्येकाला हक्काचा निवारा हवा असतो. त्यासाठी जीवाचे रान करुन पै पै करीत गोहा केलेला पैसा प्लॉट खरेदीसाठी खर्च करण्यात येतो. काही जण बँकेतून कर्ज घेतात. परंतु, भूमाफिया बोगस एनएच्या नावावर प्लॉट विक्री करीत फसवणूक करीत आहेत. पेण शहरातील मलेघर ग्रामपंचायतीच्या हद्दीत असणाऱ्या वडगावमध्ये अनधिकृतरित्या सरेआमपणे कृषीक जमिनीचे प्लॉट पाडून त्याची विक्री करण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. तरी, दलालांच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन माजी सरपंच शोमेर पेणकर आणि विद्यमान सरपंच अश्लेषा पेणकर यांनी केले आहे.

वडगाव हे महसुली गाव असून, हे गाव पूर्णपणे नव्याने विकसित होत आहे. परंतु, दलाल लोकांनी स्वतःच्या हितासाठी अनेकांना फसवले असून, तुकडाबंदी असतानादेखील चुकीच्या पद्धतीने जागा विकसित करून विकायला सुरूवात केली आहे, त्यामुळे वडगावातील विकासकामे ठप्प झाली आहेत, अशी माहिती शोमेर पेणकर आणि अश्लेषा पेणकर यांनी दिली. ते म्हणाले की, दलाल लोक कृषीक जमिनीचे तुकडे पाडून सरेआम विकत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, ही विक्री करायची असेल तर एन.ए (नॉन ॲग्री कलचर लॅन्ड म्हणजेच अकृषीक प्रयोजनात) रुपांतरण करणे गरजेचे असते. असे करत असताना प्लॉट पाडून अभिन्यास (लेआउट) करून घेणे नंतरच प्लॉट (भूखंड) विकायचे असतात. मात्र, वडगावमध्ये सरेआमपणे कृषीक जमिनीचे प्लॉट (भूखंड) पाडून जमिनी विकल्या जात आहेत. त्यामुळे चुकीच्या पध्दतीने रस्त्यांचे लेआउट काढले जातात. एन.ए जमिनीत साधारणतः नऊ मिटरचा रस्ता असतो. या रस्त्यामध्ये लाईट, सांडपाणी याची व्यवस्था करता येते, परंतु दलाल लोक स्वतःच्या फायद्यासाठी चार मीटरचा रस्ता दाखवतात. तसेच जमीन एन.ए. झाली नसल्याने राखीव भूखंड दाखवला जात नाही. दलाल स्वतःचा फायदा करून निघून जातात; परंतु भविष्यात नागरी समस्यांना येथील रहिवाशांनाच सामोरे जावे लागणार असते.

पुढे पेणकर यांनी सांगितले की, भविष्यात वडगाव हा सुनियोजित गाव विकसित होण्यासाठी काही कठोर पावले आम्ही उचलणार आहोत. त्यामध्ये जिल्हाधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करून कृषीक जमिनी अकृषीक नसताना प्लॉट पाडून जी विक्री केली जाते, त्यास बंदी आणण्याची विनंती केली जाईल. तसेच बांधकामाच्या वेळेला एन.ए प्रमाणे रस्ता व्यवस्था राखीव भूखंड नसल्यास जमीन मालकाला बांधकाम परवाना तसेच इतर सुविधा ग्रामपंचायत पुरवणार नाही. तसेच वडगाव हद्दीतील खरेदीखत असताना घेतलेली जमीन कृषीक आहे की अकृषीक हे पाहून घ्यावे, अशी विनंती सब रजिस्टरला करणार असल्याचे ते म्हणाले. भविष्यात पूरसदृश्य परिस्थिती, वाहतूक कोंडी, सांडपाण्यामुळे आरोग्याची समस्या, दिवाबत्तीची समस्या, होऊ नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार असल्याचे ते म्हणाले.

Exit mobile version