मनोज जरांगेचा सरकारवर गंभीर आरोप
| जालना | वृत्तसंस्था |
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. दरम्यान, चौथ्या दिवशी जरांगे पाटील यांची प्रकृती खालवल्याचं समोर आलं आहे. त्यांनी आज अंतरवाली सराटीमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी संताप व्यक्त केला. तसेच सरकारवर देखील गंभीर आरोप केले आहेत. सरकारकडून गोड बोलून माझा काटा काढण्याचा डाव आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
माझं आमरण उपोषण सुरु आहे. एका बाजूला मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी बैठका घेऊ, अशी चर्चा सरकारकडून सुरु आहे. मात्र, अशा चर्चा करून सरकारकडून गोड बोलून माझा काटा काढण्याचा डाव आहे, असा अंदाज दिसतो, असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. जरांगे यांनी आज अंतरवाली सराटीमध्ये पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला आहे.
सरकारकडून माझ्या आंदोलनाची दखल घेतली जात नसून, केवळ मला खेळवणं सुरु आहे. जर या आंदोलनाची दखल सरकारनं घेतली नाही, तर मराठे यांना चांगला हिसका दाखवतील, असा इशाराही जरांगे यांनी यावेळी दिला आहे. दरम्यान, जरांगे पाटील डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरही त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे.