। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबागमधील कुरुळ येथील आझाद मैदानात बुधवारी (दि.19) पीएनपी चषकाचा उदघाटन सोहळा पार पडला. यावेळी बोलताना शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील म्हणाले की, पीएनपी चषकाचे परदेशातही प्रेक्षक आहेत, हे गौरवास्पद आहे. आज अनेकजण पीएनपी चषकसोबत स्पर्धा करु पाहात आहेत, याचा अभिमान वाटतो. या स्पर्धेचा दर्जा टिकवून ठेवला पाहिजे. या स्पर्धेतून नवीन खेळाडू राज्यस्तरावर तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळतील यासाठी प्रयत्न करु. स्पर्धेच्या उदघाटनासाठी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, न्याय मिळवून देण्यासाठी लढणारा, शेतकऱ्यांसाठी जगणाऱ्या नेत्याने म्हणजेच माजी खा. राजू शेट्टी यांनी उपस्थिती लावली, हा पीएनपी चषक स्पर्धेचा गौरव आहे. राजू शेट्टी हे एक आक्रमक नेते आहेत. गोरगरीबांच्या, शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारे आहेत. त्यामुळे त्यांचा गौरव होणे गरजेचे आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

पुढे त्यांनी सांगितले की, शेतकरी, कामगार व कष्टकऱ्यांचे कैवारी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रभाकर पाटील यांच्या नावाने ही स्पर्धा भरविण्यात आली आहे. मागील वर्षी झालेल्या क्रिकेट स्पर्धेचे राज्यभर कौतूक झाले. दर्जेदार असे क्रिकेटचे सामने झाले. या खेळाच्या माध्यमातून क्रिकेट खेळाडूंना चांगली संधी देण्याचा प्रयत्न नृपाल पाटील आणि चित्रलेखा पाटील यांनी केला आहे. पीएनपी चषक क्रिकेट स्पर्धेचे नाविन्य असे स्थान आहे. ते टीकले पाहिजे. या खेळाची उंची आणखी वाढली असून नवीन खेळाडू राज्य, राष्ट्रीय पातळीवर नेण्याचा प्रयत्न यातून होत असल्याचा आनंद आहे, असे जयंत पाटील म्हणाले.