। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबागमधील कुरुळ येथील आझाद मैदानात बुधवारी (दि.19) पीएनपी चषकाचा उदघाटन सोहळा पार पडला. यावेळी बोलताना शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील म्हणाल्या की, स्व. प्रभाकर पाटील यांनी कायमच खेळाडूंचा सन्मान केला आहे. त्यामुळेच स्व. प्रभाकर पाटील यांच्या जयंतीनिमित्त नृपाल पाटील यांच्या संकल्पनेतून गतवर्षी पीएनपी चषक या स्पर्धेचा यशस्वी प्रयोग करण्यात आला होता. यावर्षी या स्पर्धेचे दुसरे पर्व आहे. यू.व्ही. स्पोर्टस्च्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. आजपर्यंत यू.व्ही. स्पोर्टस्ने भव्यदिव्य कॉम्प्लेक्स उभारले आहेत. पुढचा काळ टेनिस क्रिकेटसाठी महत्त्वाचा असणार आहे. सिझन बॉलप्रमाणेच टेनिस क्रिकेटलाही आंतरराष्ट्रीय दर्जा मिळेल. आपल्या मातीतला खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळावा, यासाठी पीएनपी चषक हे व्यासपीठ आहे. आपल्या मातीतला दर्जेदार खेळाडू व्हावा, याकरिता ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. यासाठी नृपाल पाटील यांच्या टीमसह अनेकांनी अहोरात्र मेहनत घेतली आहे. तसेच, दिवसांचा खेळ पाहण्यासाठी सारेच उत्सुक आहेत. याच स्पर्धेतील थळमधील खेळाडू आर्यन आज आंतराराष्ट्रीय स्तरावर खेळत असल्याचा अभिमान आहे. आज स्व. प्रभाकर पाटील आपल्यामध्ये असते, तर नातवाने खेळाडूंसाठी आयोजित केलेली भव्य स्पर्धा पाहून त्यांनाही अभिमान वाटला असता. या स्पर्धेतून अनेक खेळाडू आयएसपीएलमध्ये जातील. यावेळी माजी खा. राजू शेट्टी यांनी स्पर्धेची शोभा वाढवली आहे, त्याबद्दल खूप धन्यवाद, असे चित्रलेखा पाटील म्हणाल्या.

छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन
छत्रपती शिवाजी महाराज यांची बुधवारी रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी जयंती साजरी करण्यात आली. पीएनपी चषक टेनिस क्रिकेट स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी आयोजकांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांना आगळी वेगळी मानवंदना देण्यात आली. महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करून त्यांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. अलिबागमधील कुलाबा ढोल ताशा ध्वज पथकाच्या ढोल ताशांच्या आवाजाने परिसर दुमदुमला. तसेच, भोनंग येथील जय हनुमान लाठीकाठी ग्रुपमधील सदस्यांनी मर्दानी खेळाचे प्रदर्शन केले.

हजारो प्रेक्षकांसाठी सुसज्ज अशी गॅलरी
पीएनपी इन्फ्राचे संचालक नृपाल पाटील, यु.व्ही स्पोर्ट्स ॲकेडमीच्या अध्यक्षा चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकाराने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तीन हजारहून अधिक प्रेक्षक बसतील,अशी सुसज्ज गॅलरी उभारण्यात आली आहे. महिलांनादेखील ही स्पर्धा पाहण्याची संधी उपलब्ध व्हावी म्हणून खास महिलांसाठी प्रेक्षक गॅलरी बांधण्यात आली आहे.भव्यदिव्य असे मैदान खेळासाठी असून घरबसल्या स्पर्धा पाहण्यासाठी प्रो लिंक स्पोर्ट्स ही ऑनलाईन सुविधा उपलब्ध केली आहे.