क्रिकेटच्या महासंग्रामाचा भव्य उद्घाटन सोहळा
| अलिबाग | प्रतिनिधी |
पीएनपी चषकाची भव्यता बघून नृपाल पाटील व चित्रलेखा पाटील यांचे खूप कौतुक करावेसे वाटते. रायगड जिल्ह्याच्या जडणघडणीत ज्यांचा मोलाचा वाटा आहे, त्याच स्व. प्रभाकर पाटील यांच्या चळवळीच्या विचारांची प्रतारणा न करता पुढची पिढी काम करीत असल्याचे पाहून खूप अभिमान वाटला. पीएनपी चषकाचे भव्यदिव्य स्वरुप पाहून या स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होतील, यात तिळमात्र शंका नाही, असे प्रतिपादन स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे.

कुरुळ येथील आझाद मैदानात बुधवारी (दि.19) आयोजित केलेल्या पीएनपी चषकाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील, शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य द्वारकानाथ नाईक, शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, शेकाप राज्य चिटणीस मंडळाचे खजिनदार अतुल म्हात्रे, जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील, पीएनपी चषकाचे आयोजक नृपाल पाटील, जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, ॲड. राजन पाटील, शैला पाटील, सौरभ शेट्टी, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, ॲड. गौतम पाटील, पं.स. माजी सभापती सुरेश पाटील, महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघाचे अध्यक्ष विजय गिदी, शेकाप तालुक चिटणीस अनिल पाटील, तुकाराम पाटील, संतोष जंगम, ॲड. संतोष म्हात्रे, ॲड. परेश देशमुख, शरद वरसोलकर, सुरेश खोत, सतिश प्रधान, अशोक प्रधान, गणेश मढवी, संजय पाटील, ॲड. प्रसाद पाटील, ॲड. सतीश नाईक, प्रकाश पाटील, अनिल पाटील, अनिल चोपडा, संजना कीर, वैशाली कुचेकर, अनिता पवार आदी मान्यवरांसह रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, पनवेल, पेण, खालापूर, कर्जत, उरण, श्रीवर्धन, म्हसळा, माणगांव, सुधागड, तळा, पोलादपूर, महाड व रोहा येथील तालुका चिटणीस, महानगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समिती, ग्रामपंचायतीचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य, नगरसेवक, कार्यकर्ते, प्रेक्षक, संघ मालक आणि खेळाडू उपस्थित होते.

यावेळी राजू शेट्टी म्हणाले की, पीएनपी चषकाच्या उद्घाटनप्रसंगी येण्याची संधी मिळाली. चषकाचे हे देखणे स्वरूप बघून खुपच आनंद झाला. भव्यदिव्य असा सोहळा राबविल्याने जयंत पाटील, नृपाल पाटील, चित्रलेखा पाटील यांचा अभिमान वाटतो. शेतकरी चळवळीमधील पुढची पिढीदेखील विचारांची प्रतारणा न करता, जनतेसाठी जे करायला पाहिजे ते करीत आहेत, हे आजच्या कार्यक्रमातून दिसून आले आहे. गेली 25 ते 30 वर्षे शेतकरी चळवळीत काम करीत आलो आहे. या चळवळीतून जयंत पाटील यांच्याशी संपर्क झाला. शेतकऱ्यांच्या बाजूने आवाज उठविण्याची संधी जयंत पाटील यांच्या माध्यमातून विधान परिषदेत मिळाली. शेतकरी, कार्यकर्ते यांच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात जयंत पाटील यांनी विधान परिषदेमध्ये आवाज उठवून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. रायगडच नव्हे, तर संपुर्ण राज्य व देशातील जयंत पाटील आधारस्तंभ होते. दुर्देवाने ते सभागृहात नाही. त्यांची जागा भविष्यात चित्रलेखा पाटील घेतील. तसेच, स्व. प्रभाकर पाटील तथा भाऊ आणि ॲड. दत्ता पाटील नसते तर रायगडची जडणघडण दिसली नसती. या कर्तृत्ववान व्यक्तींना घडविणारा रायगड जिल्हा आहे. शेतकरी चळवळ कशी करावी हे संपूर्ण महाराष्ट्राला रायगड जिल्ह्याने दाखवून दिले आहे. जिल्ह्यामध्ये खेळालादेखील चांगल्या पद्धतीने प्रोत्साहन मिळत आहे. अतिशय देखणे असे नियोजन केले आहे. या स्पर्धेतून भारतीय संघात खेळाडू एक दिवस नक्की दिसेल, अशी विश्वास राजू शेट्टी यांनी व्यक्त केला.
जयंत पाटील शेतकऱ्यांचा बुलंद आवाज
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील हे केवळ रायगडकरांचेच नाही तर देशातील सर्व शेतकऱ्यांचा बुलंद आवाज आहेत. शेतकऱ्यांसाठी त्यांनी विधान परिषदेत कायम आवाज उठविला आहे. मात्र, दुर्दैवाने हा आवाज आता विधान परिषदेत घुमणार नाही. याचे प्रचंड दुःख आहे, असे राजू शेट्टी म्हणाले.