। अलिबाग । प्रतिनिधी ।
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानात रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील नियोजित तालुकास्तरीय मूल्यमापन समितीने प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीची माध्यमिक शाळा मिठागर या शाळेची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. मूल्यांकन निकषानुसार शाळेने केलेली सजावट, परिसर स्वच्छता, विद्यार्थी मंत्रिमंडळ कामकाज, प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत निर्माण केलेली परसबाग, महावाचन चळवळ, स्वच्छता मॉनिटर अभियान टप्पा दोन आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी निगडित व्याख्याने, मासिक पाळी व्यवस्थापन, शाळेने सामाजिक क्षेत्रात केलेले कार्य, आर्थिक साक्षरता व नव भारत साक्षरता अभियान या सर्व बाबींची पाहणी करून तपासून पडताळणी केली. या तपासणी अंती तालुक्यातील एकूण शाळांमध्ये मिठागरची पीएनपी माध्यमिक शाळा ही दुर्गम, ग्रामीण, डोंगराळ भागातील अंशतः अनुदानित असूनसुद्धा शाळेतील सर्व कर्मचारी वर्ग, संस्था-शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामस्थ मंडळ मिठागर व माजी विद्यार्थी यांच्या सहकार्याने ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानात मुरुड तालुक्यातील तिसर्या क्रमांकास पात्र ठरली आहे. या यशाबद्दल पीएनपीचे अध्यक्ष जयंत पाटील, खजिनदार नृपाल पाटील, संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, तसेच संस्था पदाधिकारी, मिठागरचे शाळा समिती अध्यक्ष व पदाधिकारी, गटशिक्षण अधिकारी सुनील गवळी, केंद्रप्रमुख जितेंद्र मकु व शाळेचे प्रमुख यांनी शाळेचे विशेष अभिनंदन केले आहे. तसेच, विविध माध्यमातून व शिक्षण क्षेत्रातून शाळेसह मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.






