महागायकाच्या सुरांनी गुंजला पीएनपीचा प्रभाविष्कार

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनी मिळविली दाद

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अवधूत गुप्ते प्रस्तुत पावनखिंड या सिनेमातील गाणं ‘राजं आलं, राजं आलं, जिंकूनी या जगभरी’ ‘शिवबा राज’ नाव गाजं जी… या गाण्याने सुरुवात केली आणि रसिक प्रेक्षकांची मने महाराष्ट्राचा महागायक अभिजीत कोसंबी यांनी जिंकून सर्वांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमात त्यांनी विविध गाणी गाऊन प्रेक्षकांना आणि विद्यार्थ्यांना गुलाबी थंडीत मनमोहक आनंद दिला. एकापेक्षा एक सरस गाण्यांचा नजराणा अभिजित कोसंबी यांनी सादर केला. त्यांच्या या सादरीकरणाला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपापल्या कला आविष्काराने उत्तम साथ दिली. प्रभाविष्काराच्या समारोपावेळी सादर झालेल्या महा गरब्याने प्रभाविष्काराच्या सादरीकरणात वेगळीच रंगत आणली.

1 / 6

पीएनपी वेश्‍वी शैक्षणिक संकुलाद्वारे प्रभाविष्कार या सांस्कृतिक सोहळ्याचे 18 ते 21 डिसेंबर या दरम्यान आयोजन करण्यात आलेले होते. प्रभाविष्कार 2024 अंतर्गत कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचा सांगता समारंभ 21 डिसेंबरला महाराष्ट्राचा महागायक अभिजीत कोसंबी यांच्या उपस्थितीत पार पडला. या सोहळ्यास संस्थेच्या कार्यावह चित्रलेखा नृपाल पाटील, बीड, केज येथील शेकाप राज्य चिटणीस मंडळ सदस्य भाई मोहन गुंड, रायगड जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी, डॉ. राजेंद्र चांदोरकर, विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य तसेच पत्रकार व इतर मान्यवरांसह कॉलेजचे संचालक विक्रांत वार्डे, कॉलेजचे प्र. प्राचार्य डॉ. ओमकार पोटे, प्राचार्य रविंद्र पाटील, डॉ. नम्रता पाटील, डॉ. रसिका म्हात्रे, मुख्य कार्यालयाचे पदाधिकारी तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, विद्यार्थी, पालक बहुसंख्येने उपस्थित होते.

कला क्षेत्रात वावरताना मी आज ज्या उंचीवर पोहचलो आहे. त्यामध्ये अलिबागकरांचा मोलाचा वाट आहे. अलिबाग मधील अनेक कलाकारांचा संपर्क महागायक होण्याअगोदर पासूनआहे. अनेक नवे आहेत ज्यांचे मला सहकार्य झाले आहे. यामध्ये पीएमपीच्या कार्यवाह चित्रलेखा नृपाल पाटील यांचे नाव अग्रस्थानी आहे. मी पीएनपी महाविद्यालयाचा सदस्य झालो आहे. आपण मला कलाक्षेत्रांतीलसोहळा आयोजित करून निमंत्रित करा मी नेहमी तुमच्या सोबत असेन, असे महाराष्ट्राचा महागायक अभिजीत कोसंबी म्हणाले.

प्रभाविष्कार या सांस्कृतिक सोहळ्यात कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाच्या आजी माजी विद्यार्थ्यांना नवरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, यामध्ये प्रज्योत पाटील – सामाजिक क्षेत्र, मानसी नागावकर – शैक्षणिक क्षेत्र, श्रुती टोपले – शैक्षणिक क्षेत्र, जयेश पाटील – कला क्षेत्र, सानिया म्हात्रे – कला क्षेत्र, सुयोग आंग्रे- साहित्य क्षेत्र, रितेश शिरोसे- अष्टपैलू, मनोज मेंगाळ – क्रीडा क्षेत्र, करण भगत – क्रीडा क्षेत्र यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

Exit mobile version