। मुंबई । प्रतिनिधी ।
गणेशोत्सव नवरात्र, दिवाळी या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री बसत आहे. सण-उत्सवांच्या काळात दैनंदिन आणि गोडधोड पदार्थांसाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडल्यामुळे सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबांचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे.
मुंबई दुग्ध उत्पादक संघाने सुट्या म्हशीच्या दुधाच्या घाऊक दरात प्रतिलिटर 9 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 1 सप्टेंबर 2026 पासून मुंबईत दुधाचा घाऊक दर 93 रुपयांवरून थेट 102 रुपये प्रतिलिटर होणार आहे. हे नवे दर 28 फेब्रुवारी 2027 पर्यंत लागू राहणार आहेत.
मुंबई दुग्ध उत्पादक संघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. वाढत्या उत्पादन खर्चामुळे दूध उत्पादकांवर आर्थिक भार वाढत असल्याचे संघाकडून सांगण्यात आले आहे. पशुखाद्याच्या दरात सुमारे 25 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. दाणा, तूरचुणी, चणाचुणी यांसह चारा, पेंड आदींच्या किमती वाढल्याने दूध उत्पादनाचा खर्च वाढला आहे. तसेच दुधाळ जनावरांच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. याशिवाय, एफडीएकडून भेसळयुक्त किंवा कृत्रिम दुग्धजन्य पदार्थांविरोधात सुरू असलेल्या कारवाईनंतर शुद्ध दुधाची मागणी वाढल्याचेही संघाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवरही दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे.
सप्टेंबरपासून गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी यांसह विविध सण सुरू होणार आहेत. या काळात दूध, खवा, मिठाई, दही, तूप यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढते. त्यामुळे सुट्या दुधाच्या घाऊक दरवाढीचा परिणाम किरकोळ बाजारासह दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीवरही होण्याची शक्यता आहे. मुंबई दुग्ध उत्पादक संघाच्या माहितीनुसार, नव्या दराचा कालावधी सहा महिन्यांचा असून 28 फेब्रुवारी 2027 नंतर दराचा पुन्हा आढावा घेतला जाणार आहे.
सीएनजीच्या दरात वाढ
मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाचा परिणाम आता देशांतर्गत इंधनाच्या दरांवरही दिसून येत आहे. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने (IGL) सीएनजीच्या किमतीत पुन्हा वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सीएनजीच्या दरात प्रति किलोग्रॅम 3.89 रुपयांची वाढ करण्यात आली असून, हे सुधारित दर शनिवार सकाळपासून लागू होणार आहेत. या वाढीनंतर दिल्लीमध्ये सीएनजीचा दर 86.98 रुपये प्रति किलोग्रॅम झाला आहे.






