माथेरानमध्ये लवकरच ‘पॉड हॉटेल’ सेवा

पर्यटकांना मिळणार उत्तम सुविधा; मध्य रेल्वेकडून हालचालींना वेग

| माथेरान | वार्ताहर |

माथेरान येथे येणार्‍या पर्यटकांना उत्तम सुविधा पुरवण्यासाठी तसेच, आरामदायी आणि किफायतशीर निवासाचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडून पॉड हॉटेल सुरू करण्यात येणार आहे. ऑगस्ट महिन्यात ही सुविधा पर्यटकांसाठी खुली करण्याच्या दृष्टीने मध्य रेल्वे प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या असून, पर्यटकांना सर्वोत्तम सेवा देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

माथेरान पर्यटनस्थळ मुंबई, पुण्याच्या हाकेच्या अंतरावर आहे. मुंबई, पुणेकरांना एकदिवसीय सहलीसाठी हे थंड हवेचे ठिकाण खूपच प्रसिद्ध आहे. मध्य रेल्वेच्या नेरळ स्थानकापासून 21 कि.मी अंतरावर माथेरान आहे. येथून मिनिट्रेन, बस किंवा टॅक्सीद्वारे माथेरानला जाता येते. माथेरान पर्यटनस्थळाला भेट देणार्‍यात देशविदेशातील पर्यटकांची संख्या लक्षणीय आहे. तसेच येथील सर्वच प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी दोन ते चार दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे येथे येणार्‍या पर्यटकांना राहण्यासाठी व सर्वोत्तम सुविधा प्रदान करण्याच्या उद्देशाने मध्य रेल्वे प्रशासनाकडून पॉड हॉटेल सुरू करण्यात येणार आहे.

माथेरान येथे दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक येतात. याठिकाणी राहण्यासाठी छोटी-मोठी हॉटेल उपलब्ध आहेत. परंतु, पर्यटकांना एकाच ठिकाणी सर्व अत्याधुनिक सुविधा प्रदान करण्यासाठी एकेरी, दुहेरी आणि कौटुंबिक पॉड्स उभारण्याचे काम सुरू आहे. या पॉड हॉटेलचे काम वेगात सुरू असून, येत्या ऑगस्ट महिन्यात ही कामे पूर्ण होतील. त्यानंतर पर्यटकांना पॉडची सुविधा उपलब्ध होईल, अशी माहिती येथे सूत्रांकडून देण्यात येत आहे.

मुंबईत पहिले पॉड हॉटेल
पश्‍चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर पहिले पॉड हॉटेल सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर मध्य रेल्वेच्या सीएसएमटी स्थानकामध्येदेखील पॉड हॉटेलची सुविधा आहे. हे पॉड हॉटेल इतर हॉटेल्सच्या तुलनेने खूप स्वस्त असल्या कारणामुळे त्यांना सर्वाधिक पसंती मिळते. पर्यटकांना उत्तम सेवा देण्याच्या उद्देशाने माथेरानमध्ये हा निर्णय घेतला असून, पर्यटकांकडून त्याचे स्वागत करण्यात आले आहे.
Exit mobile version