माथेरानमधील पॉईंट्सना मिळणार नवा लूक

। माथेरान । वार्ताहर ।
सभोवताली गर्द घनदाट वनराईने व्यापलेल्या माथेरानमधील विविध नैसर्गिकरित्या सौंदर्य लाभलेल्या पॉईंट्स ना सुरू असणार्‍या क्ले पेव्हर ब्लॉकच्या रस्त्यांमुळे एक नवा लूक पहावयास मिळणार आहे त्यामुळे पायी प्रवास करणार्‍या हौशी पर्यटकांना अगदी सहजपणे चालणे सोयीस्कर ठरणार आहे.

अनेक वर्षांपासून या रस्त्यांच्या डागडुजीची कामे प्रलंबित आणि अपूर्णवस्थेत होती. येणारे पर्यटक हे इथल्या नैसर्गिकरित्या निर्माण झालेल्या उंच उंच पॉईंट्स वरून नैसर्गिक सौंदर्य न्याहाळण्यासाठी येत असतात.यासाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून विविध पॉईंट्सच्या सुशोभीकरणाची कामे युद्धपातळीवर सुरू असून बहुतांश पॉईंट्सची कामे पूर्ण झाली आहेत. मुख्यत्वे वीज,पाणी आणि रस्ते याच मूलभूत सुविधा सर्वांसाठी आवश्यक असतात.येणार्‍या पर्यटकांचा पायी प्रवास सुखकर व्हावा यासाठी क्ले पेव्हर ब्लॉकच्या रस्त्यांमुळे पावसाळ्यात जमिनीची धूप थांबण्यास मदत होणार आहे. कधी नव्हे ती आजवरच्या काळात अपूर्ण असलेली गावाची विकास कामे सध्या उत्तम प्रकारे मार्गी लावली जात आहेत आणि ही पूर्णत्वास जाणारी सर्व कामे दीर्घकाळ टिकावीत तसेच सुयोग्य पद्धतीने केली जात आहेत की नाहीत याची खातरजमा करण्यासाठी खुद्द नगरपरिषदेचे गटनेते प्रसाद सावंत हे स्वतः आपल्या कार्यकर्त्यांसोबत जातीने लक्ष केंद्रित करत असून अन्य पक्षाच्या मंडळींना सुद्धा सोबत घेऊन कामांची पाहणी करत आहेत.

Exit mobile version