विषारी पाण्यामुळे माशांचा खच

| उरण | वार्ताहर |

चिरनेर येथिल श्री समर्थ वेअर हाऊस नामक एका गोदामातून विषारी आणि केमिकल युक्त पाणी नाल्यात सोडल्यामुळे नाल्यातील मासे मरून पडले आहेत. हे दुषित पाणी आजूबाजूच्या शेतीमध्ये जाऊन त्याचा दुष्परीणाम शेतीवर होण्याची शक्यता असल्याने संबधीत गोदाम चालकावर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी केली आहे. चिरनेर- खारपाडा रस्त्यालगत श्री समर्थ वेअर हाऊस असून या गोदामातून बुधवारी (दि.13) विषारी केमिकल युक्त पाणी नाल्यात सोडण्यात आले होते. हे पाणी नाल्यात सोडल्यामुळे संपूर्ण नाल्यातील पाणी लाल झाले आणि त्यामुळे या नाल्यात असणारे मासे तडफडून मरू लागले.

काही दिवसांपूर्वी कोप्रोली येथिल ग्लोबिकॉन सीएफएस मधून असेच दुषित पाणी सोडल्याने संपूर्ण नाल्याचे पाणी दुषित होवून मासे मेले होते. आत्ता चिरनेर विभागातील अनधिकृतपणे थाटलेल्या गोदामांमध्ये देखिल हे प्रकार घडू लागले आहेत. त्यामुळे या गोदामांवर उरण तहसील, सिडकोने आणि महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version