| पोलादपूर | प्रतिनिधी।
तालुक्यातील वाकण गावाच्या हद्दीतील गोपाळवाडी येथे साईडपट्टी नसलेल्या रस्त्यावरून नियंत्रण सुटल्याने मोटारसायकलची झाडाला जोरदार धडक बसून मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या मोटारसायकलवरील दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शनिवारी (दि.23) सायंकाळी कापडे बुद्रुक गावाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर झाला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, ग्रुप ग्रामपंचायत देवळे हद्दीतील लहुळसे गावातील तरुण मोटारसायकल भरधाव वेगात चालवत असताना वाकण पितळवाडी जवळच्या गोपाळवाडी येथे रस्त्याला साईडपट्टी नसल्याने मोटारसायकलीवरील नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला असलेल्या महाकाय वृक्षाला मोटारसायकलने जोरदार धडक दिली. या अपघातात मोटारसायकलस्वार रोहित धनावडे याचा जागीच मृत्यू झाला. मोटारसायकलवर मागे बसलेला एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.
या अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मृत रोहित धनावडे व जखमी तरुण यांना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. जखमी तरुणाची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला माणगाव येथे हलविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलादपूर पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.







